लोकसत्ता प्रतिनिधी
नवी मुंबई : निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच आचारसंहिता लागू होते. त्यानंतर ७२ तासांच्या आत शहरातील विद्यामान राजकीय नेत्याचे फोटो असलेले फलक, भित्तिचित्रे हटवली जातात तसेच उद्घाटनाचा शिलान्यास आदी फारशीवरील नावे झाकली जातात. मात्र एपीएमसीत आचार संहिता लागू आहे की नाही अशी स्थिती असून राजकीय नेत्यांचे जाहिरात फलक, आणि कार्यालयावरील फलक कायम आहेत.
लोकसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच आचारसंहिता लागू होते. आचारसंहिता नियमानुसार शहरातील फलक, भित्तिचित्रे, ज्यावर विद्यामान राजकीय नेत्यांचे फोटो नाव केलेल्या कामांचा उल्लेख, अशी माहिती असेलेले असे फलक काढून टाकण्यात येतात. त्यामुळे शनिवारपासून ही घाई सुरु झाली आहे. असे असले तरी नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत मात्र आचारसंहिता पोहोचलीच नाही अशी परिस्थिती आहे.
आणखी वाचा- नऊ लाखांचा गुटखा जप्त; दोघांना अटक
वास्तविक आज (मंगळवारी ) संध्याकाळी पाचपर्यंत अशा प्रकराची कारवाई करणे आवश्यक होते. मात्र कुठलीच कारवाई न केल्याने पाच नंतर ही सर्वच ठिकाणी राजकीय नेत्यांची छायाचित्रे असलेले फलक (बॅनर) बिनदिक्कत झळकत होते. संध्याकाळी साडेचार पाच नंतरही कारवाई सुरु करण्यात आली. अशी माहिती एका व्यापाऱ्याने दिली. तर कृषी उत्पन्न बाजार समिती सचिव पी. एल. खंडागळे यांनी आजच सदर कारवाई सुरु केली असून लवकरच पूर्ण कारवाई करण्यात येईल अशी माहिती दिली.
७७ ठिकाणी कारवाई
नवी मुंबई मनपा अंतर्गत सर्वच ठिकाणची भित्तिचित्रे मिटवण्यात आली असून फलकही काढून टाकण्यात आले आहेत. मंगळवारी विधानसभा क्षेत्रात ७७ ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. यात चार ठिकाणी भित्तिचित्रे, ५१ फलक, दहा ठिकाणी राजकीय पक्षांचे झेंडे काढून टाकण्यात आले. मात्र बेलापूर विधानसभेतील आकडेवारी उपलब्ध झाली नाही.