सध्या बाजारात भाज्या चांगल्याच वधारल्या आहेत. मात्र, त्यामध्ये ही आता हिरवा वाटणा अधिक भाव खात आहे. घाऊक बाजारात वाटाणा प्रतिकिलो २०० रुपयांवर गेला आहे. त्यामुळे गृहिणींनी वाटाणा न खाण्याला पसंती दिली आहे. तर किरकोळ बाजारात ही वाटाणा हद्दपार झालेला दिसत आहे.
हेही वाचा- अज्ञात व्यक्तीला ओटीपी देणे पडले महागात ; महिलेची १ लाख ५४ हजार रुपयांची फसवणूक
वाढत्या दरामुळे हिरवा वाटाणा आवाक्याबाहेर
मागील दोन आठवड्यापासून भाज्यांच्या महागाईने उचांक गाठला आहे. यामुळे सर्वसामान्यांचे मात्र कंबरडे मोडले आहे. गृहिणींच्या मेजवानीमध्ये वाटाणा हा नित्याने लागणारी भाजी आहे. मात्र २०० रुपयांनी उपलब्ध असणारा वाटाणा खाणे म्हणजे आवाक्याबाहेरचे झाले आहे. एपीएमसी घाऊक बाजारात राज्यातील आवक सुरू असून परराज्यातील वाटाण्याचा हंगाम सुरू होण्यासाठी दोन महिने अवकाश आहे. सध्या बाजारात साताऱ्यातून अवघ्या ४ छोट्या गाड्या दाखल झाल्या असून केवळ ८५ क्विंटल आवक झाली आहे. त्यामुळे आज शनिवारी बाजारात वाटण्याचे दर कडाडले आहेत. सोमवारी घाऊक बाजारात प्रतिकिलो १००-१२०रुपयांनी उपलब्ध असलेला वाटाणा आता १८०-२०० रुपयांवर पोहचला आहे. त्यामुळे किरकोळ विक्रेत्यांनी वाटाणा नको रे बाबा हे धोरण अवलंबले आहे तर गृहिणींनी वाटाण्याला नापसंती दर्शवली आहे.
हेही वाचा- नवी मुंबई : तृतीयपंथीयांच्या स्वच्छतेची विक्रमी नोंद
गृहिणींचे आर्थिक बजेट कोलमडले
एपीएमसी बाजारात सध्या राज्यातील वाटाणा दाखल होत असून आज अवघे ४ टेम्पो आवक झाली आहे. त्यामुळे आज हिरव्या वाटाण्याचे दर वधारले आहेत. प्रतिकिलो १८०-२००रुपयांनी विक्री झाला असल्याची माहिती एपीएमस बाजारातील घाऊक व्यापारी बापू शेवाळी यांनी दिली. तर गेल्या पंधरा दिवसांपासून भाज्या महाग झाल्या आहेत. त्यामुळे आर्थिक बजेट कोलमडत आहे. आता तर हिरवा वाटाणा अधिक महाग झालेला आहे. आधी २०० रुपयांत आठवड्यातील भाज्या पुरेशा होत्या. आता २०० रुपयांची एकच भाजी खाणे हे न परवडणारे असल्याचे मत गृहिणी समिधा तावडे यांनी व्यक्त केले आहे.