पश्चिम रेल्वेवरील उपनगरीय रेल्वेगाड्यांसाठी १ ऑक्टोबरपासून नवीन वेळापत्रक लागू करण्यात येणार आहे. या वेळापत्रकात अप आणि डाउन मार्गावरील सामान्य लोकलच्या ५० फेऱ्यांचा विस्तार करण्यात आला आहे. यापैकी तब्बल १६ फेऱ्या विरारच्या प्रवाशांसाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. त्यामुळे भविष्यात विरारकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.

हेही वाचा- जेएनपीटी ते गेट वे लाँच सेवा शनिवारपासून पूर्ववत होणार

गेल्या काही वर्षांमध्ये विरारमध्ये मोठया प्रमाणात रहिवासी संकुले उभी राहिली असून दक्षिण मुंबईच्या तुलनेत स्वस्तात मोठे घरे मिळत असल्याने अनेकांनी विरारची वाट धरली. त्यामुळे विरारमधील लोकसंख्येत मोठी वाढ झाली आहे. तसेच विरारहून नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने दक्षिण मुंबई आणि आसपासच्या परिसरात येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. परिणामी, लोकल गाड्यांना गर्दी वाढू लागली होती. त्यामुळे १५ डबा जलद लोकल सुरू करण्यात आल्या. तसेच अंधेरी – विरारदरम्यान १५ डबा धीमा लोकल मार्ग प्रकल्प पूर्ण करून धीम्या लोकलही सुरू करण्यात आल्या.

हेही वाचा- परीक्षा तोंडावर, शिक्षक मिळेनात? कोपरखैरणेतील महापालिका सीबीएसईचे विद्यार्थी मेटाकुटीला

आता १ ऑक्टोबरपासून नवीन वेळापत्रक लागू करताना चर्चगेट आणि विरारच्या दिशने जाणाऱ्या ५० फेऱ्यांचा विस्तार करण्यात आला आहे. या विस्तारात विरारच्या प्रवाशांना काहीसा दिलासा मिळाला असून ११ फेऱ्या विरारला जाण्यासाठी आणि पाच लोकल फेऱ्या विरारहून अप दिशेला जाण्यासाठी विस्तारित करण्यात आल्या आहेत. सकाळी ६.२३ वाजताची चर्चगेट-वसई जलद लोकल सकाळी ६.२५ वाजता, तसेच सकाळी ६.५६ ची महालक्ष्मी-बोरिवली धीमी लोकल २७ वाजता विरारसाठी सोडण्यात येणार आहे. सकाळी ७.४२ वाजताची बोरिवली-भाईंदर धीमी लोकल त्याचवेळी विरारसाठी सोडण्यात येणार आहे. सकाळी ११.३८ ची बोरिवली-भाईंदर धीमी लोकल, दुपारी १२.३५ ची अंधेरी-भाईंदर धीमी लोकल, दुपारी २.१३ ची अंधेरी-भाईंदर धीमी लोकल, सायंकाळी ४.३७ ची अंधेरी-वसई जलद लोकल, सायंकाळी ४.५९ ची अंधेरी-वसई जलद लोकल ४.५६ वाजता, सायंकाळी ६.५२ ची अंधेरी-नालासोपारा धीमी लोकल ६.५० वाजता, सायंकाळी ७.११ वाजता अंधेरी-नालासोपारा धीमी लोकल सायंकाळी ७.१० वाजता, रात्री १०.४१ ची बोरिवली-नालासोपारा धीमी लोकल विरारसाठी सोडण्यात येणार आहे.

हेही वाचा- निश्चय केला…नंबर पहिला…; देशात स्वच्छ सर्वेक्षणात कितवा नंबर पटकावणार याची नवी मुंबईकरांना उत्सुकता

चर्चगेट गेटच्या दिशेने जाणाऱ्या पाच लोकल फेऱ्या विरारहून सोडण्यात येणार आहेत. पहाटे ३.४० वाजताची नालासोपारा-बोरिवली धीमी लोकल विरार येथून ३.३५ वाजता, तर सकाळी ७.५४ ची बोरिवली-चर्चगेट जलद लोकल विरार स्थानकांतून सकाळी ७.१५ वाजता सोडण्यात येणार आहे. त्याचबरोबर नालासोपारा-बोरिवली सायंकाळी ४.५५ ची धीमी लोकल ४.४८ वाजता, सायंकाळी ५.३८ वाजता नालासोपारा-बोरिवली धीमी लोकल सायंकाळी ५.३२ वाजता, रात्री ९.१६ वाजताची वसई-अंधेरी जलद लोकल ९.०३ वाजता विरार येथून सोडण्यात येणार आहे. यामुळे प्रवाशांना काहीसा दिलासा मिळणार आहे. पंधरा डबा लोकलच्या फेऱ्या वाढवताना यात विरार प्रवाशांना डोळ्यासमोर ठेवून नियोजन करण्यात आल्याचे पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.