नवी मुंबई : समाजमाध्यमातून ओळख करीत, हृदयात रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिन्यांतील अडथळे (ब्लोकेज) काढण्यासाठीचे तेल स्वस्तात मिळते. माझ्याच कंपनीला निर्यात केले तर चांगला नफा मिळेल असे आमिष दाखवत हरियाणातील एका व्यक्तीची ९ लाख ९३ हजारांची आर्थिक फसवणूक केली. या प्रकरणी कोपरखैरणे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

श्रीचंद मोहनलाल (६९) असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. २०१७ मध्ये फेसबुकच्या माध्यमातून त्यांचा परिचय विल्यम निल्डा मायकेल याच्याशी परिचय झाला. यातून वारंवार संपर्क झाल्याने दोघांची मैत्री झाली. विल्यम हा इंग्लंड येथील ‘मेसर्स हेल्थ फार्मास्युटिकल’ कंपनीत खरेदी-विक्री विभागात व्यवस्थापक असल्याचे त्याने श्रीचंद यांना सांगितले होते.

हृदयात रक्त पुरवठा करणाऱ्या वाहिन्यांतील अडथळे (ब्लॉकेज) काढण्यासाठीच्या तेलासाठी भारतात ५०० मिलीलिटरला ३ हजार ८०० अमेरिकन डॉलर दर आहे. तर तेच तेल इंग्लंडमध्ये ११ हजार अमेरिकन डॉलरला विकले जाते असे सांगितले. भारतात नवी मुंबइतील कोपरखैरणे भागात हे तेल मिळत असून सीमा जैन यांचा मोबाइल क्रमांकही श्रीचंद यांना दिला. श्रीचंद यांनी सीमा जैन यांच्याशी संपर्क करून तेल मागवत त्यापोटी त्यांनी दिलेल्या बँक खात्यात ४ लाख ३८ हजार रुपयांचा भरणाही केला. हे तेल इंग्लंड येथे पाठवले. काही दिवसांनी विल्यम याने तेल खात्रीशीर असून त्याच्या सर्व तपासण्या झाल्या आहेत. त्यात तेल सर्व मानके पूर्ण करत असल्याचे सांगत १० लिटर तेलाची ऑर्डरही दिली. श्रीचंद यांनी सीमा जैन यांच्याशी संपर्क करून तेलाची मागणी केल्यावर त्यांनी ५ लाख आगाऊ  रक्कम भरण्यास सांगितले. त्याप्रमाणे त्यांनी पैसेही भरले. मात्र तेल मिळाले नाही म्हणून जैन यांच्याशी संपर्क केल्यावर त्यांनी ३५ लाख रुपये एकरकमी भरल्यावर तेल मिळेल असे सांगितले. यावर श्रीचंद यांना संशय आल्याने त्यांनी जैन यांच्या कोपरखैरणे कार्यालयाबाबत माहिती काढली असता ते कार्यालय कायम बंदच असल्याचे समोर आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने श्रीचंद यांनी ‘नॅशनल कमिशन ऑफ शेडय़ुल्ड कास्ट’ कार्यालयात तक्रार केली. ही तक्रार कोपरखैरणे पोलीस ठाण्यात शनिवारी वर्ग करण्यात आली. पोलीस सीमा जैन आणि विल्यम्स याचा शोध घेत आहेत, अशी माहिती कोपरखैरणे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूर्यकांत जगदाळे यांनी दिली.