अनेक गुन्हे उघडकीस येणार

नवी मुंबई रुबाबदार शरीरयष्टी, करारी आवाज आणि कायद्याची जुजबी माहिती असलेल्या एका तीसवर्षीय तरुणाने टिटवाळा पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक असल्याची बतावणी करून ठाण्यातील एका महिला पोलिसाला तसेच ऐरोलीतील एका नागरिकाला दोन लाखांचा गंडा घातला. रबाले पोलिसांनी या तोतया पोलिसाला बेडय़ा ठोकल्या असून त्याने अशा प्रकारे अनेक पोलिसांना फसविल्याची प्रकरणे समोर आल्याने सीबीडी दिवाणी न्यायालयाने त्याला ५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. पोलीस असल्याचे नाटक वठविण्यासाठी त्याने ओळखपत्रापासून ते गणवेशापर्यंत सर्व तयारी केली होती.

मुरबाडमधील दहीगाव येथील राहणारा मिलिंद रमेश देशमुख या तीसवर्षीय तरुणाने ही कार्यपद्धती गेली दोन वर्षे अमलात आणली आहे. ऐरोली सेक्टर आठमधील तानाजी कांबळे यांनी केलेल्या तक्रारीनंतर साहाय्यक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर व वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनकर मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान नांगरे यांनी या ठगासाठी गेले आठ दिवस सापळा रचला होता. अटक केल्यानंतर त्याने अशा प्रकारे अनेक महिला पोलिसांना फसविले असल्याचे समोर आले आहे. त्याचा तपास सध्या सुरू आहे.

पोलिसांसारखी लकब असलेल्या या तरुणाने गणवेशदेखील तशाच प्रकारे वापरला होता. सचिन पाटील असे नाव धारण करून त्याने प्रथम कांबळे यांच्या मुलाला नोकरीस लावतो असे सांगून एक लाख ७५ हजार उकळले. त्यासाठी या देशमुख याने कांबळे यांची ओळख वाढवली. टिटवाला पोलीस ठाण्यात सध्या काय तपास सुरू आहे, इथपासून आपण यापूर्वी कशा प्रकारे गुन्हेगारांना पकडले आहे याच्या काहण्या देखील त्याने कांबळे कुटुंबीयाला सांगून छाप पाडली. कांबळे फसल्यानंतर त्याने ठाणे येथील पोलीस मुख्यालयात असलेल्या महिला पोलीस कामिनी पवार (नाव बदलले आहे) यांच्याशी फेसबुकवर ओळख वाढवून त्यांचे नवी मुंबईतील घर गाठले. फेसबुक, व्हाट्सअप दोस्तीवर विश्वास ठेवू नका सांगणारे पोलीस या ठगाच्या गोड बोलण्यात आले. स्वत: पोलीस सेवेत असलेल्या पवार यांनाही या लखोबा लोखंडेने लग्नाचे आमिष दाखविले. पवार यांच्या घरी ये-जा सुरू झाल्यानंतर त्यांच्या घरातील दागिने या तोतया पोलिसाने लंपास केले. त्यामुळे तोतया पोलिसाने खऱ्या पोलिसांना ५० हजारांपेक्षा जास्त किमतीचे दागिने चोरून गंडा घातला.

या तोतया पोलिसाने अनेक खऱ्या पोलिसांना तसेच नागरिकांना चुना लावला असल्याचा संशय रबाले पोलिसांना आहे. त्यामुळे त्याला पोलीस कोठडी मागण्यात आली आहे. फसविल्याच्या अनेक तक्रारी घेऊन नागरिक पोलीस ठाण्यात जात असतात. अशा वेळी पोलिसांनाच गंडा घालणाऱ्या या ठगाची चर्चा सर्वत्र सुरू आहे.