नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये अधिकारी, कर्मचारी पदांच्या भरतीच्या खोट्या जाहिराती, सूचना प्रसारित करण्यात येत असल्याची माहिती पालिकेला प्राप्त झाली आहे. त्याचप्रमाणे काही जण महानगरपालिकेच्या बनावट लेटरहेडवर खोटे बोधचिन्ह आणि शिक्का वापरून नियुक्तीपत्र देखील देत असल्याचे निदर्शनास येत आहे. याबाबत संबंधित उमेदवारांकडून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलेली असून नवी मुंबई महानगरपालिकेनेही पोलीस विभागाकडे रितसर तक्रार केली आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये सध्या कोणत्याही पदासाठीची भरती प्रक्रिया सुरू नाही. त्यामुळे नागरिकांनी अशा प्रकारच्या दिशाभूल करणाऱ्या माहितीला अथवा जाहिरातींना बळी पडू नये व प्रतिसाद देऊ नये तसेच संभाव्य आर्थिक नुकसान टाळावे असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेने केले आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेमधील भरती किंवा कोणत्याही अधिकृत माहितीसाठी नागरिकांनी महानगरपालिकेची वेबसाईट https://www.nmmc.gov.in यावर तसेच महानगरपालिकेच्या अधिकृत फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम पेजला भेट द्यावी असे आवाहन नमुंमपा प्रशासन विभागाने केले आहे. दरम्यान, यापूर्वीही नवी मुंबई महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत पाणीपुरवठा होणार नाही, असे चुकीचे संदेश पाठवण्यात आले होते त्याबाबतही पालिकेने नेरूळ पोलीस ठाण्यात तक्रार केली होती.
नवी मुंबई महापालिकेत भरती सुरू असल्याचे सांगत काही लोकांकडून पैसे मागितले जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. अशाप्रकारे कोणाची फसवणूक होऊ नये व फसवणूक झाली असेल त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार करावी. शरद पवार, उपायुक्त, नवी मुंबई महापालिका