पनवेल ः प्रती माणसी तीन किलो गहु आणि चार किलो तांदुळ सरकार मान्य रास्त धान्य दुकानातून मिळविण्यासाठी कुटूंबातील मोठ्यांसह लहानग्यांना रांगेत तासंतास ताटकळत उभे रहावे लागत आहे. तीन तासांपेक्षा अधिक वेळ रांगेत उभे राहूनच रेशनवरील धान्य मिळेल याची खात्री नसल्याने रहिवाशी संताप व्यक्त करत आहे. ही गोंधळाची स्थिती पनवेल महापालिका क्षेत्रातील कळंबोली उपनगरातील सरकार मान्य रास्त धान्य दूकान क्रमांक ३ वरील आहे. रेशनींगचे धान्य मिळविण्यासाठी संबंधितांनी केवायसी करणे गरजेचे असल्याने रेशन दूकानावरील पॉझमशीन व्यवस्थीत चालत नसल्याने अनेक मिनिटांचा खोळंबा होत आहे. रांगेत उभे राहिल्यानंतर धान्य मिळण्याची वेळ येते त्यावेळेस केवायसी नसल्यास त्या कुटूंबप्रमुखाला खाली हात परतावे लागत असल्याने सरकारचे नियम सर्वसामान्यांसाठीच का असा प्रश्न नागरिक विचारु लागले आहेत.
रविवार असल्याने घरातील कर्त्या व्यक्तीला सुट्टी असल्याने कळंबोली येथील सेक्टर १० मधील श्री कृष्णा हेरीटेज या इमारतीमधील गाळ्यामध्ये जीजाई महिला बचत गटाला रास्त धान्य वाटपासाठी रेशनदूकान दिले आहे. गणेशोत्सवात अनेक रहिवासी मूळ गावाहून परतल्यानंतर त्यांनी रेशन मिळविण्यासाठी या दूकानावर रविवारी सकाळपासून गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. नागरिकांची धान्य मिळविण्यासाठी एकच झुंबड असल्याने दूकानदाराची सुद्धा भंबेरी उडाली. रेशन दूकान क्रमांक ३ वर कळंबोली वसाहतीचा काही भाग असून कळंबोली गावातील ग्रामस्थांना सुद्धा आठवड्यातील दोन दिवस विभाजून दिले आहेत. तरी एकाच वेळी धान्य घेण्यासाठी रहिवाशी आल्याने तासंतास गर्दीत रहिवाशांना उभे रहावे लागत आहे. सरकारने धान्य वाटपाची सोय तंत्रशुद्ध व तातडीने करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
हे ही वाचा…नवी मुंबई : एकाच दिवशी घरफोडीच्या पाच घटनांची नोंद
केवायसी करण्यासाठी ज्यांची नाव रेशनकार्ड मधे आहेत त्या सर्वांना दुकानात यावं लागणार असल्याचे सांगीतले जाते. आधारकार्ड घेऊन आणि कुटूंबातील सगळ्यांची बायोमेट्रीक होणार आहे. अंगठ्याचे ठसे. मग ते आज होण शक्य नाही. गर्दी खुप आहे. आणि उद्या बोलावलं तर मुलींची शाळेची सुट्टी आणि आमचे कामावरचे खाडे करुन सगळ्यांनाच एकत्र यावं लागेल. कीती हा त्रास फक्त जगण्यासाठी. सरकारी सर्व नियम फक्त सामान्यांनीच पाळायचे, धनदांडग्यांना सरकारी मुभा असते. राजकुमार वाघमारे, रेशनकार्डधारक
हे ही वाचा…नेरुळ विभागात अनधिकृत झोपड्यांवर पालिकेची कारवाई
रेशन धान्य दूकानावरील पॉझ मशीनव्दारे होणा-या केवायसीवेळी सर्व्हरमध्ये गतीमानता आल्यास ही समस्या उदभवणार नाही. त्यासाठी वरिष्ठ स्तरावर प्रयत्न सूरु आहेत. आश्विनी धनवे, पुरवठा अधिकारी