पूजा कल्लूर, करिश्मा भोसले यांच्या कुटुंबांवर शोककळा

शालेय जीवनात ती अत्यंत हुशार.. पण आर्थिक गणितामुळे भारतात वैद्यकीय शिक्षण घेणे शक्य नव्हते.. म्हणून तिने त्यासाठी देशांतर करीत रशियाची वाट चोखाळली. मात्र एका दुर्घटनेमुळे तिचे डॉक्टर होण्याचे स्वप्न भंगले..

पूजा सिद्धरप्पा कल्लूर आणि करिश्मा भोसले या दोन तरुणींचा रशिया येथील स्मोलेन्सक स्टेट मेडिकल अ‍ॅकॅडमीच्या भारतीय वसतिगृहात लागलेल्या आगीमुळे गुदमरून झालेला मृत्यू नवी मुंबईत अनेकांच्या मनाला चटका लावून गेला आहे. या वसतिगृहातील चौथ्या मजल्यावरील ४२३ क्रमांकाच्या खोलीत रशियातील उणे तापमानामुळे लावण्यात आलेल्या हीटरच्या अतिउष्णतेने इमारतीला आग लागल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले आहे. केवळ चार महिन्यांनंतर पूजा डॉक्टर होऊन भारतात परतणार होती. या पाश्र्वभूमीवर घडलेल्या या घटनेमुळे कल्लूर कुटुंबावर शोककला पसरली आहे.

नेरुळ येथील पूजाला डॉक्टर होण्याचा ध्यास होता. एअर इंडियातून सेवानिवृत्त झालेल्या सिद्धरप्पा यांचा आठ मुली आणि एक मुलगा असा मोठा परिवार आहे. मोठय़ा कष्टाने व काटकसरीने सर्व मुली व मुलाला त्यांनी उच्चशिक्षण दिले असून दोन मुली एमबीए करीत आहेत. सहा मुली विवाहित असून पूजा ही शेंडेफळ होती. कुटुंबातील पहिली डॉक्टर होण्याचा तिचा हट्ट होता. मात्र देणगी आणि शुल्क यांच्या फेऱ्यात तिला येथे डॉक्टर करणे शक्य नव्हते. त्यावर उपाय म्हणून पूजानेच चार वर्षांपूर्वी रशियात जाऊन डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बालगले. वैद्यकीय शिक्षणासाठी स्वस्त स्मोलेन्सक अ‍ॅकॅडमीत भारतातील दोन हजार विद्यार्थी आहेत. दोन क्रमांकांच्या वसतिगृहातील चौथ्या मजल्यावर पुण्यातील करिश्मा भोसले व नवी मुंबई नेरुळची पूजा कल्लूर राहात होती. रशियातील थंडीवर मात करण्यासाठी सर्वच विद्यार्थी विद्युत हीटरचा वापर करीत. कडाक्याच्या थंडीमुळे शनिवारच्या रात्री अभ्यास करून रविवारी दिवसा आराम करण्याची पद्धत या दोघींनी अवलंबिली. पूजाच्या शेजारील विद्यार्थ्यांनी त्यांच्या खोलीतील नादुरुस्त हीटर दुरुस्त करून पुन्हा लावला असता त्याच्या अतिउष्णतेमुळे जवळच्या गादीने पेट घेतला आणि काही मिनिटांत खोलीला आगीने वेढले. रात्री जागत अभ्यास केल्यानंतर रविवारी पहाटे गाढ झोपेत असलेल्या पूजाच्या खोलीत पसरलेल्या धुरामुळे त्यांना जाग आली नाही. या दोघींचा गुदमरून मृत्यू झाला. दूतावासाच्या सहकार्यामुळे या दोघींच्या मृतदेहाचे लवकर शवविच्छेदन झाले आहे. मृतदेह बुधवारी येण्याची शक्यता कल्लूर कुटुंबाचे शेजारी गोपाळ नाईक यांनी व्यक्त केली.

भोसले कुटुंबावर आघात

रशियातील दुर्घटनेत करिश्मा उदय भोसले या विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याने पुण्यातील पर्वती पायथ्यानजीक असलेल्या लक्ष्मीनगर येथील म्हाडा कॉलनीत राहणाऱ्या भोसले कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मोठी अपेक्षा ठेवून आम्ही करिश्माला रशियात शिक्षणासाठी पाठविले होते. तिच्या अकाली मृत्युमुळे आमचे स्वप्न भंगले, अशा शब्दांत भोसले कुटुंबीयांनी भावना व्यक्त केल्या. तिचे शालेय शिक्षण कटारिया प्रशालेत झाले होते. दहावी झाल्यानंतर तिने मुक्तांगण महविद्यालयात विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. बारावीनंतर तिने वैद्यकीय प्रवेशासाठी परीक्षा दिली. आजारी असल्याने तिला अपेक्षेएवढे गुण मिळाले नाहीत. त्यामुळे आम्ही कर्ज काढून तिला पुढील शिक्षणासाठी रशियात पाठवण्याचा निर्णय घेतला. तिच्याकडून आमच्या अपेक्षा होत्या. मात्र काळाने तिच्यावर घाला घातल्याने आमचे स्वप्न भंगले, अशी भावना भोसले कुटुंबीयांनी व्यक्त केली.

Story img Loader