सिडकोच्या उरण मधील भूसंपदानाच्या प्रक्रियेत जमिनी विकत घेणाऱ्या दलालांपासून सावध राहण्याचे आवाहन मंगळवारी उरण मध्ये झालेल्या शेतकऱ्यांच्या बैठकीत करण्यात आले आहे. सिडकोने १२ ऑक्टोबर २०२२ ला भूसंपदानाची अधिसूचना जाहीर केली आहे. यामध्ये चाणजे,नागाव व रानवड(केगाव),बोकडविरा,पाणजे,फुंडे, नवघर,पागोटे या गावातील जमिनी सिडको कडून संपादीत करण्यात येणार आहे. ही जमीन सिडको शेतकऱ्यांकडून त्यांच्या संमतीने संपादीत केली जाणार आहे. यासाठी कोणताही भूसंपदानाचा कायदा लागू होत नाही. तर शेतकऱ्यांनी स्वतः संमतीने द्यावयाची आहे. त्याकरिता मोबदला म्हणून संपादीत जमिनीच्या साडेबावीस टक्के जमीन देण्यात येणार आहे.
हेही वाचा >>>नवी मुंबई: ऐरोली खाडी किनारी परदेशी पाहुण्यांचे आगमन; फ्लेमिंगो दाखल झाल्याने बोटींग सफर लवकरच सुरू होणार
सिडकोच्या या भूसंपदानाला येथील शेतकऱ्यांचा विरोध आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी सिडकोच्या अधिसूचनेला लेखी हरकतीही नोंदविल्या आहेत. असे असले तरी काही बडे पैसेवाले दलाला मार्फत येथील शेतकऱ्याच्या जमिनी ४ ते ५ लाख रुपये गुंठ्यांनी खरेदी केल्या जात आहेत. त्यानंतर या जमिनींचे संमती पत्र सिडकोला दिली जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी दलाल व सिडको कडून वाचवून आपल्या जमिनींचे संरक्षण करावे याकरिता आंदोलन केले जाणार आहे. यासाठी मंगळवारी उरण मधील आद्य क्रांतिकारक वासुदेव फडके सभागृहात झालेल्या बैठकीत हे आवाहन करण्यात आले. यावेळी सुधाकर पाटील, भूषण पाटील,रामचंद्र म्हात्रे,काका पाटील,संतोष पवार, संजय ठाकूर ,दीपक ठाकूर व अरविंद घरत आदीजण उपस्थित होते.