उरण : या वर्षी मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर पावसाचे आगमन झाले आहे. त्यामुळे शेतकरी सुखावला असून शेतकऱ्यांनी भातपिकाच्या पेरण्या केल्या आहेत. आतापर्यंत उरण तालुक्यात अवघ्या ६० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे पेरणीनंतर आवश्यक असलेला पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांना शेती उपयुक्त पावसाच्या आगमनाची आस लागून राहिली आहे. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
आणखी वाचा-नवी मुंबई : मोरबे धरणात ३८ दिवस पुरेल इतका पाणीसाठा!
उरण तालुक्यातील पूर्व तसेच पश्चिम विभागातील काही गावांतच शेती शिल्लक राहिली आहे. यामध्ये विविध उद्याोगांसाठी संपादित जमिनी तसेच समुद्राच्या भरतीचे पाणी शेतीत शिरल्याने नापिकी झालेल्या जमिनी वगळता उर्वरित शेतीवर पीक घेतले जात आहे. मात्र अनेक वर्षांपासून पावसाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या मेहनतीच्या तुलनेने लाभ होत नाही. असे असतानाही कित्येक शेतकरी कुटुंबे ही निष्ठेने शेती करीत आहेत.