लोकसत्ता प्रतिनिधी
उरण: न्हावा शिवडी सागरी (पारबंदर) पुलामुळे देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचे सर्वात नजीकचे उपनगर म्हणून उरणच्या विकासाला वेग येणार आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांनी दलालांच्या आमिषाला बळी पडून आपल्या शिल्लक जमीनी न विकता त्या राखाव्यात असे आवाहन आता उरण मधील शेतकरी संघटना आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून केले जात आहे. उरणच्या पूर्व व नागाव, केगाव आणि चाणजे परिसरात काही प्रमाणात शेती शिल्लक आहे. मात्र या जमीनी खरेदीसाठी बिल्डर आणि मोठं मोठ्या राजकीय नेत्यांचे दलाल गावोगावी सक्रिय झाले आहेत.
नवी मुंबईतील सिडकोच्या साडेबारा टक्के विकसित भूखंड व जमिनीचा वाढीव मोबदला यामुळे येथील सुखासीन आयुष्य जगणाऱ्या,मौजमजा करणाऱ्या प्रमाणे तुम्ही ही तुमच्या जामीनी विका म्हणजे तुम्हाला ही एशोरामात जगता येईल अशी स्वप्ने दाखवीत हे दलाल शेतकऱ्यांच्या मुला मुलींना भरीस पाडत आहेत. मात्र उरण तालुक्यातील जमीनी या सोन्यापेक्षा अधिक किंबहुना त्याही पेक्षा अधिक किंमतीच्या होणार आहेत. त्यामुळे त्या टिकवून आणि राखून स्वतःची मालकी हक्क ठेवून आपलं अस्तित्व अबाधित ठेवा असे आवाहन महाराष्ट्र किसान सभेचे कोषाध्यक्ष संजय ठाकूर यांनी केले आहे.
हेही वाचा… नवे विमानतळ मुंबईच्या आणखी जवळ; शिवडी न्हावा शेवा पुलापासून विमानतळापर्यत थेट सागरी किनारा मार्ग
विविध उद्योग व नागरीकरण यामुळे उरण तालुक्यातील शेत जमीनी झपाटयाने घटू लागली आहे. त्यातच उरण तालुक्यातील खोपटे ते आवरे परिसरातील शेकडो एकर जमीनीत समुद्राचे बांध(बाहेरकाठे) फुटल्याने खारे पाणी येऊन नापिकीमुळेही शेती नष्ट झाली आहे. या समुद्राच्या भरतीच्या पाण्यात येणार खारफुटीच्या बिया ओहटीच्या वेळी परत न जाता शेतातच शिल्लक राहिल्याने त्यांना पालवी फुटते. परिणामी भात पिकाच्या जमीनी खारफुटीची जागा घेऊ लागल्या आहेत. याचाही फटका शेतकऱ्यांवर शेतीची मालकीच गमविण्याची वेळ आली आहे. या घटत्या शेत जमीनी मुळे उरण मधील बहुतांशी शेतकरी भूमीहीन होण्याच्या मार्गावर आहे. उरण मधील वाढत्या औद्योगिक व नागरीकरण यामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे.
हेही वाचा… नवी मुंबई : एन.एम.एम.टी. बसला आग; सुदैवाने जीवित हानी नाही
२०२२ मध्ये भात पिकाखाली असलेली ५ हजार ६२२ हेक्टर जमीनी कमी होऊन २०२३ मध्ये अवघ्या २ हजार ५५१ हेक्टर वर आली आहे. तर यातील केवळ १ हजार ६०० हेक्टर जमिनीवरच भात पीक घेतले जात आहे. तालुक्याचे एकूण क्षेत्रफळ १८ हजार ६११ हेक्टर होते. यामध्ये ३ हजार ७०७ वनक्षेत्र, ओसाड आणि मशागतीस अयोग्य १ हजार ९२२ हेक्टर, पडीक ६ हजार ४१० हेक्टर,बागायती ७२ हेक्टर, जिरायती ७ हजार २५८ ,पेरणी योग्य ५ हजार ६२२ हेक्टर, पिकाखालील ५ हजार ८८४ हेक्टर तर खार जमीन ४ हजार ८७६ हेक्टर क्षेत्र होते.
हेही वाचा… उरणमध्ये स्वच्छता अभियानाचा एक दिवस एक तासा पुरताच ठरला; गांधी जयंतीला पुन्हा कचरा रस्त्यावरच
उरण मध्ये नवी मुंबई प्रकल्पासाठी ११ हजार हेक्टर, जेएनपीटी बंदरा करीता २ हजार ५०० हेक्टर जमीन त्याच प्रमाणे उरणच्या पूर्व विभागात बंदरावर आधारीत १०० पेक्षा अधिक गोदामासाठी शेकडो एकर जमीनीवर मातीचा भराव करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना जमीनी राखण्यासाठी समाजमाध्यमातून ही आवाहन केले जात आहे. त्यामुळे शेतकरी आणि त्यांच्या वारसांनी याची दखल घेत आमिषाना बळी न पडण्याची विनंती केली जात आहे. यासाठी जनजागृती मोहीम ही राबविण्यात येणार आहे.