७०० रुपयांच्या मेथीसाठी १५० रुपयांचा ‘सेझकर’

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शेतमाल थेट ग्राहकांच्या दारात आणण्याच्या उद्देशाने अडत आणि व्यापारीमुक्त धोरणाला पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीने हरताळ फासला आहे. आटपाडी येथील शेतकरी भानुदास पवार यांनी आणलेल्या मेथीच्या ७० जुडय़ांसाठी पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीने दीडशे रुपयांची ‘सेझ’कर पावती फाडण्याची सक्ती केली आहे. गेली अनेक वर्षे तालुक्यात शेतकऱ्यांची पिळवणूक करणारा ‘सेझकर’ समितीने लागू केला आहे.

सिडको वसाहतींमध्ये शेतमाल थेट आणून विकण्यासाठी काही शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे; मात्र शेतमाल कुठूनही आणला तरी पनवेल कृषी उत्पन्न समितीची पावती फाडण्याची सक्ती करण्यात आली आहे. आटपाडी येथील शेतकरी भानुदास पवार यांनी ७० जुडय़ा मेथी विक्रीसाठी आणली. कळंबोली येथील सेक्टर-१० मध्ये त्यांनी विक्रीसाठी ती ठेवली होती.

काही वेळाने त्या ठिकाणी बाजार समितीचे रक्षक आले. त्यांनी पवार यांच्या हातात १५० रुपयांची पावती ठेवली. मेथीची प्रत्येक जुडी दहा रुपये दराने विकणाऱ्या पवार यांना ७०० रुपयांच्या कमाईसाठी १५० रुपयांचा तोटा सहन करावा लागला.

शिवसेनेचे रायगड जिल्हा सल्लागार बबन पाटील आणि आत्माराम कदम यांनी हा प्रकार उजेडात आणला. शेतकऱ्यांकडून अन्यायकारक वसुली बंद करण्यासाठी बाजार समितीला निवेदन दिले आहे.

१९९५ साली व्यापारी व कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सदस्यमंडळात झालेल्या बैठकीच्या ठरावाप्रमाणे व्यापाऱ्यांनी बाजार समितीने ठरवलेला ‘सेझकर’ भरण्यासाठी सिडको वसाहतींच्या प्रवेशद्वारावर चौकी उभारली आहे. संबंधित शेतकऱ्याने शेतकरी असल्याचा दाखला दाखविल्यास त्यांच्याकडूनही सेझकर वसूल केला जाणार नाही.

– भरत पाटील, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, पनवेल

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Farmers forced recovery due to agricultural product direct marketing