उरण : नेरुळ – उरण रेल्वेच्या नोकर भरतीत प्रकल्पग्रस्तांना प्राधान्य द्या या मागणीसाठी सोमवारपासून आंदोलन सुरू केले आहे. उरण तालुक्यातील धुतुम ग्रामपंचायत हद्दीत असणाऱ्या शेमटीखार प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना रेल्वेसाठी जमिनी संपादित करूनही सिडको व रेल्वे प्रशासनाने कोणताही न्याय दिला नसल्याने या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी सोमवारपासून रांजणपाडा रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वारा समोर आमरण उपोषण सुरू केले आहे.
प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही अशी माहिती संस्थेच्या उपाध्यक्ष रेश्मा ठाकूर यांनी दिली आहे. धुतूम ग्रामपंचायत हद्दीत असणाऱ्या शेमटी खार या महसूल विभागातील जमिनी सिडकोने व रेल्वे प्रशासनाने रेल्वे स्थानकासाठी घेतल्या. मात्र या प्रकल्पात त्यांनी स्थानिक शेतकऱ्यांना नोकर भरती व इतर रोजगारात प्राधान्य न देता इतरांना सामावून घेतले आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांवर अन्याय झाला आहे. या अन्याया विरुद्ध शेमटी खार शेतकरी श्रमिक कल्याणकारी सामाजिक संस्था व धुतुम ग्रामस्थ मंडळाने उपोषण सुरू केले आहे.
हेही वाचा – पनवेल : मुंब्रा पनवेल मार्गावर नावडे येथे शाळेलगत रासायनिक टँकर कलंडला
या उपोषणात शेमटी खार शेतकरी श्रमिक कल्याणकारी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विनोद ठाकूर, उपाध्यक्षा रेश्मा ठाकूर यांच्यासह अनेक ग्रामस्थ सहभागी झाले आहेत. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील, जिल्हा परिषद सदस्य कुंदा ठाकूर, माजी जिल्हा परिषद सदस्य वैजनाथ ठाकूर, उद्योगपती राजेंद्र खारपाटील, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) तालुकाध्यक्ष परिक्षित ठाकूर, तालुका सचिव दिनेश पाटील, माजी उपसरपंच शरद ठाकूर यांनी उपस्थित राहून प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना आपला पाठिंबा दिला.