लोकसत्ता प्रतिनिधी
उरण : लोकसभेची आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर उरणच्या शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीच्या मागणीसाठी बैठक घेत निवडणुकीवर बहिष्कार जाहीर केला आहे. चाणजे ग्रामपंचायत हद्दीतील सुमारे १०० हून अधिक शेतकरी कुटुंबांच्या २५० एकर जमिनीवर खारफुटीमुळे नापिकी झाली आहे. तर दुसरीकडे सीआरझेड लागू असल्याने ही जमीन हातची गमावण्याची वेळ शेतकऱ्यांवर आल्याने हा बहिष्कार घातला आहे.
शेतजमिनीवर कांदळवन आले असून त्याची शहानिशा ने करता सी.आर.झेड.मध्ये दाखविल्याने स्वत:च्या मालकीची शेती असूनसुद्धा शेतकरी (मालक) ही जमीन कोणाला विकू शकत नाही तसेच या क्षेत्रात कोणतेही पीक घेऊ शकत नाही. अशा गंभीर समस्यांमध्ये अडकलेल्या शेतकऱ्यांच्या या महत्वाच्या समस्येकडे लोकप्रतिनिधींसह सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी तसेच महाराष्ट्र शासनाने नेहमी दुर्लक्ष केले आहे. परिणामी स्वत:च्या मालकीची शेती असूनही येथील शेतकरी स्वत:च्या मूलभूत न्याय्य हक्कापासून वंचित राहिला आहे.
आणखी वाचा- नवी मुंबई : आचारसंहिता लागू झाल्यानंतरही ‘एपीएमसी’त फलक कायम
येथील शेतकऱ्यांनी चाणजे शेतकरी संघर्ष समितीच्या माध्यमातून श्री हनुमान मंदिर, कोंढरीपाडा, करंजा, तालुका उरण, जिल्हा रायगड येथे एका बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत चाणजे शेतकऱ्यांच्या कोणत्याही समस्या न सुटल्याने येणाऱ्या लोकसभा, विधानसभा निवडणुकांवर एकमताने बहिष्कार टाकून निवडणुकीत मतदान न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
५० ते ६० वर्षांपूर्वी मौजे चाणजे खाडीतील शेतजमिनीवर मोठ्या प्रमाणात भातशेती केली जात होती, परंतु कालांतराने बंदिस्त तुटत गेल्यामुळे समुद्राचे पाणी मोठ्या प्रमाणात शेतीत येऊ लागले परिणामी येथील शेतजमिनीत खारफुटीचे अतिक्रमण होत गेले. अनेक वृक्षांचे, कांदळवनांचे शेतात अतिक्रमण झाले. अशा प्रकारे मौजे चाणजे येथील शेतजमीन समुद्राच्या पाण्याखाली आणि खारफुटीखाली गेली आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या जमिनी शेतकऱ्यांना शासनाने शेती म्हणून परत करा या मागणीसाठी लोकसभा निवडणुकीत मतदान न करण्याचा एकमुखी निर्णय घेतला असल्याची माहिती चाणजे शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष अविनाश म्हात्रे यांनी दिली आहे.