उरण : जेएनपीएच्या राष्ट्रीय मार्ग ३४८ ला जोडणाऱ्या पागोटे ते चौक मार्गासाठी कळंबूसरे येथील शेतकऱ्यांच्या जमीनी संपादित केल्या जाणार आहेत. त्याचे सर्वेक्षण करण्यासाठी अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी विरोध केला. यावेळी या मार्गाच्या भूसंपादनापूर्वी शेतकऱ्यांना विश्वासात न घेता हे सर्वेक्षण सुरू आल्याचा त्यांचा दावा आहे. तसेच भांडवलदार, कंपनी प्रशासनाच्या फायद्यासाठी सर्वेक्षणाचा काम सुरू असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.
केंद्र सरकारने नुकतीच ग्रीनफिल्ड राष्ट्रीय राजमार्ग (पागोटे -राष्ट्रीय राजमार्ग ३४८ ते चौक) या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. साडेचार हजार कोटी रुपये खर्चाचा हा मार्ग जेएनपीए ते पळस्पे या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३४८ ला जोडला जाणार आहे. जेएनपीए बंदरातील वाढत्या कंटेनर हाताळणीमुळे वाहन संख्येतही वाढ होणार आहे. त्यामुळे जेएनपीए मार्गावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असल्याने भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून हा मार्ग उभारला जाणार आहे.
इकॉनॉमिक कॉरिडॉर म्हणून संबोधण्यात येणारा हा मार्ग जेएनपीए बंदर खोपटे, एमएसआरडीसी, नैना आणि एनएमडीपी असा असणार आहे. भारत माला योजनेतून या मार्गाला मंजुरी देण्यात आली आहे. केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे उरणचे आमदार महेश बालदी यांनी याची मागणी केली होती. या प्रकल्पसाठी कळंबूसरे, चिरनेर गावातील स्थानिक भूमिपुत्रांना, शेतकऱ्यांना विश्वासात न घेता, कोणालाही नोटीस न देता भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी जमिनीचे सर्वेक्षण सुरू केले होते. सर्वेक्षण सुरू केल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी काम बंद पाडले. यावेळी शेतकरी विक्रांत पाटील यांनी जोरदार युक्तिवाद करत, आक्रमक भूमिका घेऊन सर्वेचे काम बंद केले. या जमिनी भांडवलदारांच्या, कंपनी प्रशासनाच्या घशात घालण्याचा डाव असून शेतकऱ्यांना कोणतेही नुकसान भरपाई मिळालेली नाही. त्यामुळे ही शेतकऱ्यांची पूर्णपणे फसवणूक आहे. त्यांना विश्वासात न घेता काम सुरु झाल्याने ते काम शेतकऱ्यांनी बंद पाडले. यानंतर कोणतेही सर्वे होऊ नसल्याचे शेतकऱ्यांनी स्पष्ट केले.
मुंबई-पुणे अतिजलद प्रवास
ग्रीनफिल्ड राष्ट्रीय राजमार्ग (पागोटे -राष्ट्रीय राजमार्ग ३४८ ते चौक) या प्रकल्पाला केंद्राने नुकतीच मंजुरी दिली आहे. मुंबई पुणे द्रुतगती मार्गाला जोडणाऱ्या प्रस्तावित उरणमधील जेएनपीए बंदरातील पागोटे ते चौक या ३० किलोमीटर लांबीच्या मार्गामुळे मुंबई पुणे मार्गातील जवळपास २० किलोमीटरचे अंतर कमी होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे मुंबई ते पुणे हा प्रवास अतिजलद गतीने होणार आहे.