उरण : गेल (इंडिया) लिमिटेड कंपनीच्या उरण ते उसर( अलिबाग) अशी प्रोपिन वायू ची वाहिनी टाकण्यात येणार असून या वाहिनीसाठी उरण मधील शेतकऱ्यांच्या जमिनीचा वापर केला जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतांच्या मध्य भागातून ही वाहिनी टाकण्यात येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान होणार असून वाहिनीचा मार्ग बदलावा अन्यथा ती रद्द करण्याची मागणी करीत शेतकऱ्यांनी केंद्रीय राज्य मंत्री कपिल पाटील यांनाच साकडे घातले आहे. त्यासाठी त्यांची भेट घेतली आहे.
यापूर्वी ही आशा प्रकारच्या वाहिन्यांसाठी उरण मधील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादीत करण्यात आल्या असून त्याचा मोबदला व भाडेपट्टी दिले जात नसल्याचा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. त्याचप्रमाणे वायू वाहिनी जमिनीतून गेल्यानंतर अनेक बंधने येतात. त्यामुळे ही प्रस्तावित वायू वाहिनी रद्द करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. प्रोपेन वाहिनी संदर्भात सामाजिक कार्यकर्ते गोरख ठाकूर यांनी शेतकर्यां समावेत केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील ह्यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.त्या संदर्भात पाटील यांनी भूसंपादन अधिकाऱ्यांशी संपर्क करून सूचना दिल्या.
हेही वाचा <<< नवीन पनवेलचा जिवघेणा उड्डाणपुल
प्रस्तावित वायू वाहिनी रद्द करण्यात यावी किंवा तिचा मार्ग बदलण्यात यावा ,अशी भूमिका शेतकर्यांनी घेतली आहे.त्याचप्रमाणे ३(१) च्या आलेल्या नोटीसींचे शेतकर्यांचे हरकती चे अर्ज गेल इंडिया कंपनी ला बेलापूर येथील त्यांच्या कार्यालयात.शेतकर्यांच्या वतीने देण्यात आले आहेत. यावेळी सामाजिक कार्यकर्ते गोरख ठाकूर यांच्या समवेत गावातील शेतकरी महेश भगत, चांगदेव ठाकूर व मनोहर म्हात्रे हे उपस्थित होते.गेलच्या वाहिनी मूळे उरण पनवेल मधील गावातील शेतकर्यांचे नूकसान होणार असून ती रद्द करावी अन्यथा मार्ग बदलावा.पण प्रत्येकवेळेला विकासासाठी शेतकर्यांचा उगाच बळी देवू नये असे मत सामाजिक कार्यकर्ते गोरख ठाकूर यांनी व्यक्त केले आहे.