तलाठीही लॅपटॉपधारक; तलाठी कार्यालयातील शेतकऱ्यांचे हेलपाटे वाचणार
महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांचे सातबारा उतारे ऑनलाइन करण्याची घोषणा केली असून त्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचे काम पूर्ण होत आले असल्याने उरणमधील ६० हजारापेक्षा अधिक शेतकऱ्यांना थेट ऑनलाइन सातबाराचा उतारा मिळणार आहे.
उरण तालुक्यातील महसूल विभागाचेही ऑनलाइनचे काम आटोक्यात आलेले आहे. ज्या शेतकऱ्यांच्या सातबाराच्या उताऱ्यांचे काम पूर्ण झालेले आहे. अशा शेतकऱ्यांना शासनाच्या संकेतस्थळावर जाऊन आपल्या गावाचे नाव व सव्र्हे क्रमांक टाकल्यास घरबसल्या सातबाराचा ऑनलाइन सातबाराचा उतारा मिळत आहे. शासनाच्या या निर्णयामुळे तलाठी कार्यालयातील शेतकऱ्यांचे हेलपाटे थांबण्यास मदत होणार असल्याने शेतकऱ्यांकडून आनंद व्यक्त केला जात आहे.
शेतकरी आणि त्यांच्या वारसांना विविध कामांसाठी सातबाराच्या उताऱ्याची आवश्यकता असते. त्यासाठी खेडय़ातील शेतकऱ्यांना शहरातील तलाठी कार्यालय गाठावे लागते. अनेकदा तलाठी जागेवर नसल्याने एका सातबाराच्या उताऱ्यासाठी अनेक फेऱ्या माराव्या लागतात. त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ व पैसाही खर्च होत होता. त्यामुळे शेतकऱ्यांना ऑनलाइन सातबाराचे उतारे मिळावेत अशी योजना राज्य सरकारने राबविली आहे.
त्याची सुरुवात अनेक ठिकाणी झालेली असून उरण तालुक्यातील महसूल विभागानेही तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्याचे काम करण्यास सुरुवात केलेली आहे. उताऱ्याची माहिती संकलित करून त्याचा डाटा तयार करण्यात येऊन ते पुण्यातील महसूल विभागाशी जोडण्यात आल्याची माहिती उरणचे नायब तहसीलदार रवींद्र पाटील यांनी दिली आहे.
त्यामुळे शेतकरी कोणत्याही ठिकाणावरून ऑनलाइन सातबारा काढू शकणार आहेत. तसेच सध्याच्या मोबाइलमधील नेटच्या सुविधेमुळे मोबाइलवरही सातबाराचा उतारा उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी यावेळी लोकसत्ताशी बोलताना सांगितले.
उरण तालुक्यातील २६०० हेक्टर जमीन असलेल्या ६० हजार ६०८ सातबाराधारक शेतकऱ्यांना याचा फायदा होणार असल्याचे या वेळी स्पष्ट करण्यात आले.
उरणमधील ६० हजार शेतकऱ्यांचा सातबारा ऑनलाइन
शेतकरी आणि त्यांच्या वारसांना विविध कामांसाठी सातबाराच्या उताऱ्याची आवश्यकता असते.
Written by जगदीश तांडेल
Updated:
First published on: 26-01-2016 at 07:41 IST
Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Farmers will get online info abour land owers details