उरण ते मुंबई जलप्रवास; तिकिट दरवाढ कायम
जलद लाँच(स्पीड बोट) सेवा पावसाळ्यानंतरही सुरू न झाल्याने उरणकर जलद मुंबई जलप्रवासाला मुकत असतानाच मेरीटाइम बोर्डाने १ ऑक्टोबरपासून कमी करण्यात येणार दर यावर्षी जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या मार्गावरील प्रवासाचे दर हे ५५ रुपयेच राहणार असल्याची माहिती बंदर अधिकाऱ्यांनी दिली आहे.
उरणकरांसाठी स्वस्त आणि आरामदायक व पर्यावरणपूरक असा उरण (मोरा) ते मुंबई (भाऊचा धक्का) या जलप्रवासाची व्यवस्था आहे. दरवर्षी पावसाळ्यात समुद्राच्या रुद्रावतारामुळे प्रवासी संख्या कमी होत असल्याने तिकिटाच्या दरात वाढ केली जाते. या पावसाळ्यात ५५ रुपये असे तिकीट दर करण्यात आले होते.
रस्ते प्रवासाच्या त्रासामुळे उरण ते मुंबईदरम्यान अनेक प्रवासी लाँचने प्रवास करतात. सध्या या मार्गावरील जलद प्रवासासाठी साध्या बोटीबरोबरच स्पीड बोटीची सेवाही सुरू करण्यात आली होती. त्यामुळे उरणवरून अवघ्या अर्धा ते पाऊण तासातच मुंबईत पोहचता येत होते.
पावसाळ्यात समुद्र खवळलेला असल्याने प्रवाशांची संख्या कमी होते. त्याचप्रमाणे अनेकदा ती बंद करावी लागते. या कालावधीत महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाकडून दरवाढ केली जाते. या पावसाळयात साध्या बोटीसाठी ४८ रुपयांवरून तिकीट ५५ रुपये करण्यात आले होते. ही दरवाढ वाढत्या इंधन दरवाढीतूनच करण्यात आल्याने तसेच दररोज वाढणाऱ्या इंधनदरवाढीमुळे पावसाळयातीलच दर कायम ठेवण्यात आलेले आहेत.
या संदर्भात मोरा बंदराचे अधिकारी प्रभाकर पवार यांच्याशी संपर्क साधला असता, दर कमी केले नाहीत तसेच पावसाळ्यात बंद केलेली जलद लाँच सेवा बंदच असल्याची माहिती दिली.