पनवेल तालुक्यातील कासारभट गावात एका नवविवाहितेला भरदिवसा जाळून मारल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी विवाहितेचा पती, सासू आणि सासरा यांना पोलिसांनी अटक केली आहे. ज्योती टावरी असे विवाहितेचे नाव असून पाच महिन्यांपूर्वीच तिचा विवाह झाला होता.
पेण तालुक्यातील रावे गावची ज्योती टावरी हिचा विवाह मे महिन्यात पनवेल येथील कासारभट गावातील नीलेश म्हात्रेसोबत झाला होता. पनवेलच्या कर्नाळा बँकेत नीलेश काम करतो. ज्योती हिचे शिक्षण कला शाखेत बारावीपर्यंत झाले होते. विवाहानंतर ज्योतीने अनेकदा पालकांकडे सासुरवास होत असल्याची तक्रार केली होती. परंतु मुलगी घरी परत आल्यास बदनामी होईल, या भीतीने वडील हिरामन टावरी यांनी ज्योती व तिच्या सासरच्या मंडळींना समजावून ज्योतीला सासरी नांदावयास भाग पाडले. ज्योती सुशिक्षित असल्याने पती, सासू, सासरे यांच्याशी बोलताना न पटणारे त्यांचे बोलणे खपवून घेत नसे. त्यामुळेच तिला जाळून मारल्याचे नवीन पनवेल पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. ६ डिसेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता घरातून धूर येत असल्याने तिच्या शेजारच्यांनी तिच्या वडिलांना दूरध्वनीवरून कळवले. तपासात ज्योतीचे जळालेले शरीर घरात पडलेले आढळले. पोलिसांनी या प्रकरणी संशयित आरोपी म्हणून ज्योतीचे सासरे, सासू व पती नीलेश यांना अटक केली. घटनेत नीलेशने ज्योतीचे हात पकडले व सासू मालूबाई हिने तिच्यावर रॉकेल टाकून जाळले, असे तपासात निष्पन्न झाल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेंद्रनाथ देशमुख यांनी ‘महामुंबई वृत्तान्त’शी बोलताना दिली.