पनवेल – खांदेश्वर वसाहतीमध्ये एका खाटिकाने स्वत:च्या मुलीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेबाबत पीडित मुलीच्या आईने पोलिसांत नराधम बापाविरोधात गुन्हा नोंदविला आहे. विशेष म्हणजे, चार महिन्यांपूर्वी या खाटिकाने बलात्कार केल्यानंतर १४ वर्षांची पीडिता दोन महिन्यांची गरोदर राहिल्यावर तिच्या आईला याबाबत कळले.
नवीन पनवेल येथील निगाहे करम या मटन विक्रीच्या दुकानावर मुलगी खर्चासाठी पैसे आणण्यासाठी बापाकडे गेल्यावर त्याने हा विकृत प्रकार केल्याचे तक्रारीत आईने म्हटले आहे. पीडितेला व तीच्या आईला ठार मारण्याची धमकी खाटीक बापाने दिल्याने पीडिता अनेक दिवस गप्प होती. अखेर तिच्या प्रकृतीच्या तक्रारीनंतर आईला संशय आल्याने तिला डॉक्टरांकडे नेण्यात आले. तेथे तिच्या विविध तपासण्या झाल्या. तपासणी अहवालानंतर आईने पोलिसांत धाव घेतली. या सर्व घटनेमुळे खांदेश्वरचा परिसर हादरला आहे. या संवेदनशील घटनेचा तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) वैशाली गलांडे या करीत आहेत. खांदेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गलांडे यांनी बलात्कार आणि बालक लैंगिक शोषण प्रतिबंध कायद्यानुसार संशयित आरोपीविरोधात गुन्हा नोंदविला आहे.