नवी मुंबई : ग्रामीण भागात केंद्रशासनाच्या योजनेची अंमलबजावणी न करताच एका संस्थेने सिडको कडून ७९ लाख ४९ हजाराची रक्कम वसूल केली. एवढी रक्कम दिल्यावर संबंधित संस्थेने कुठलीही हालचाल न केल्याचे निदर्शनास आल्यावर संबंधित संस्था चालक विरोधात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा सीबीडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. हि संस्था नाशिक येथील आहे. कैलास आढाव असे यातील आरोपीचे नाव आहे. दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना हि केंद्र सरकारची असून त्यात केंद्राचा ६० तर राज्याचा ४० टक्के असा सहभाग आहे.
२०१५/१६ ते २०२१ पासून हा उपक्रम सुरु आहे. सध्या या योजनेचे अंमलबजावणी राज्य अभियान व्यवस्थापन कक्ष ग्रामविकास भवन खारघर नवी मुंबई येथून केली जात आहे. या योजनेचा उद्देश्य ग्रामीण भागातील युवक युवतींना विविध क्षेत्रातील कौशल्य विषयक प्रशिक्षण देणे , रोजगार संधी उपलब्ध करून देणे असा आहे . योजनेचे अंतर्गत “ध्येयपूर्ती सेवा स्वयंरोजगार व प्रशिक्षण को ऑपरेटिव्ह शिवराम नगर दासक, जेलरोड, नाशिक” या संस्थेची निवड योजना अंमलबाजवणी साठी करण्यात आली. त्याची कायदेशीर सोपस्कार पार पाडून ३ डिसेंबर २०१५ मध्ये संस्था अध्यक्ष कैलास आढाव सोबत करार करण्यात आला.
हेही वाचा >>> अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर आरटीओची करडी नजर; एका दिवसात तब्बल १४ वाहनांवर कारवाई
यासाठी अनुदानाचा पहिला हप्ता २५ % रक्कम ७९ लाख ४९ हजार रुपये संस्थेच्या खात्यात जमा करण्यात आली. त्यानंतर १६ एप्रिल २०१६ पूर्वी प्रशिक्षण सुरु करणे बंधनकारक होते. मात्र सदर संस्थेने प्रशिक्षण सुरु केले नाही. याबाबत वेळोवेळी नोटीस बजावण्यात आल्या . त्याची सुनावणीची घेण्यात आली. मात्र संस्थेने कुठलीही हालचाल केली नाही. शेवटी सिडको कार्यालय ५ वा माळा महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियान राज्य व्यवस्थापन कक्ष उपसंचालक यांनी दिलेल्या तक्रारीवरून सीबीडी पोलिसांनी आढाव यांच्या विरोधात आर्थिक फसवणूक कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तापास आर्थिक गुन्हे शाखा करीत आहे.