नौदलाच्या तुणीर विभागाच्या डोंगराला बुधवारी सायंकाळी ६ वाजता वणवा लागल्याने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले होते.बुधवारी सायंकाळी पावणेसहा वाजण्याच्या सुमारास उरण शहरालगत असलेल्या तुणीर परिसरालगत असलेल्या डोंगरामध्ये वणवा लागल्याचे दिसून आले. डोंगराच्या पूर्व बाजूला असलेल्या भवरा झोपडपट्टीच्या दिशेने सुमारे ७०० ते ८०० मीटर लांबीच्या पट्ट्यात ही आग लागली होती.
या घटनेची माहिती मिळताच नौदलाच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले होते. यावेळी, सिडको आणि नौदलाच्या सुमारे पाच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. तर, डोंगराला लागलेल्या वणव्याच्या ठिकाणी अग्निशमन दलाच्या गाड्या पोहचू शकत नसल्याने अग्निशमन दलाच्या जवानांनी डोंगरावर जाऊन आग विझविण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, सुमारे तीन तासांपेक्षा अधिक काळ ही आग विझविण्याचा प्रयत्न सुरू होता. तर, यावेळी, सुरक्षिततेचा उपाय म्हणून अग्निशमन दलाच्या काही गाड्या या नौदलाच्या आतल्या बाजूला ठेवण्यात, तर एक गाडी ही बाहेरच्या रस्त्याच्या बाजूला ठेऊन आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करण्यात आला.