गळके छत, पडक्या भिंती, मोडक्या खिडक्या; १७ वर्षांत एकदाही डागडुजी नाही
आपत्कालीन स्थिती असो वा आग, प्राणांची पर्वा न करता सामान्यांना वाचवणाऱ्या ऐरोली येथील अग्निशमन कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना रोजच असुरक्षिततेच्या झळा सोसाव्या लागत आहेत. नवी मुंबई महापालिकेच्या ऐरोली येथील अग्निशमन केंद्राची इमारत आणि निवासी वसाहत या दोन्ही इमारती जीर्ण झाल्या आहेत. ३२ कर्मचारी कार्यरत असणाऱ्या या केंद्राच्या इमारतीची गेल्या १७ वर्षांत एकदाही डागडुजी करण्यात आलेली नाही.
सिडकोने नवी मुंबई पालिकेला सार्वजनिक वापराचे भूखंड हस्तांतरित केल्यानंतर, पालिकेने तब्बल १८ वर्षांपूर्वी ऐरोली बस डेपोनजीक अग्निशमन केंद्र व निवासी संकुल उभारले. या निवासी संकुलाच्या दोन इमारतींमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांसह, दुय्यम कर्मचारी आजही राहतात. या कर्मचांऱ्याच्या वेतनातून दरमहा इमारत देखभाल दुरुस्तीसाठी हजार रुपये आणि भाडय़ासाठी वेतनाच्या ३० टक्के रक्कम कापून घेतली जाते. एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर महापालिकेच्या तिजोरीत पैसे जमा होत असताना कार्यालयाचे छत कोसळण्याच्या बेतात आहे. खिडक्या मोडकळीस आल्या आहेत. पावसाळ्यात होणाऱ्या गळतीमुळे कार्यालयाबाहेर खर्ची टाकून कारभार करावा लागतो. या वास्तूंचे जिन्यांचे, घरांचे छताचे प्लास्टर पडले आहे, तर अनेक भागांत ते कोसळण्याच्या बेतात आहे.
पिण्याच्या पाण्यापासून शौचालयापर्यंत सर्वच सुविधांची अवस्था बिकट आहे. कर्मचांऱ्यासाठी दूरध्वनीवगळता कोणत्याही सुविधा नाहीत. अग्निशमन केंद्राच्या मैदानाला असलेल्या सुरक्षा भिंतींच्या जाळ्या आणि दोन्ही प्रवेशद्वारांचे फाटक मोडकळीस आले आहे. त्यामुळे या इमारतीच्या मोकळ्या मैदानात अनेक मद्यपी अंधाराचा फायदा घेत ठाण मांडतात. कर्मचांऱ्याना कपडे बदलण्यासाठी व विश्रांतीसाठी असणाऱ्या कक्षांचीदेखील अवस्था दारुण आहे.
नजीकच्या वसाहतीच्या पाणी आणि सांडपाणी वाहिन्यांतील पाणी अनेकदा या मैदानावर येते. त्यामुळे नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. ऐरोली अग्निशामन केंद्राअंतर्गत एमआयडीसीचा औद्योगिक पट्टा आणि महापालिकेचे १ ते १६ प्रभाग असा सर्वाधिक लोकवस्तीचा परिसर येतो. मात्र जनतेचे प्राण वाचविणाऱ्या या कर्मचांऱ्याना आपलाचा जीव धोक्यात घालून कामाचा गाडा हाकावा लागत आहे. अनेकदा राजकीय नेते सिडकोकडून भूखंड हस्तांतरित झाले नसल्याची ओरड करतात. मात्र सिडकोने हस्तांतरित केल्यांनतर १८ वर्षांत महापालिकेला या अग्निशमन केंद्राला संजीवनी देता आलेली नाही.
या केंद्राच्या मैदानात अग्निशमन केंद्राच्या वाहनांबरोबरच महापालिकेची इतर वाहने देखील रात्री पार्क करण्यात येतात. त्यामुळे कर्मचाऱ्यांना सकाळच्या वेळी सरावासाठी इतरत्र जावे लागते. त्यामुळे कर्मचारी त्रासले आहेत.
कर्मचाऱ्यांचा तुटवडा
२००८ पासून आजपर्यंत म्हणजे सुमारे १० वर्षांत महापालिकेने अग्निशमन दलात कोणत्याही प्रकाराची भरती केलेली नाही. या केंद्रामध्ये ३१ कर्मचारी असून आपत्कालीन स्थिती, नियंत्रण आढावा, वरिष्ठ व राजकीय नेत्यांचे दौरे असे कामकाज एकाच कर्मचाऱ्याला दोन पाळ्यांत पाहावे लागते. या ठिकाणी आणखी १० कर्मचांऱ्याची आवश्यकता आहे.
मद्यपींचा अड्डा
ऐरोली अग्निशामन केंद्राच्या आवरात रेस्क्यू टॉवर आहे. मात्र त्यात आजवर सुविधा देण्यात आलेल्या नाहीत. लाखो रुपये खर्चून बांधण्यात आलेली ही इमारत पडीक झाली आहे. अग्निशमन केंद्राच्या प्रवेशद्वाराला कुंपणच नसल्यामुळे त्याचबरोबर सुरक्षा भिंतींची पडझड झाल्याने अनेक गर्दुल्ले या पडीक इमारतीत मद्यपान करतात.
ऐरोली अग्निशमन केंद्राच्या पुनर्बाधणीसाठी १६ कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. जुन्या इमारतीचे व वसाहतीचे स्थलांतर करण्यात येईल. तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाली असून पुढील महिन्यात प्रस्ताव सर्वसाधरण सभेत मांडण्यात येईल.
– संजय देसाई,
कार्यकारी अभियंता, नमुंमपा
पुनर्बाधणी व डागडुजीसाठी महिनाभरापूर्वी पत्रक देण्यात आले आहे. अभियंत्यांच्या अहवालानंतर तांत्रिक बाबी पूर्ण करून काम सुरूकरण्यात येणार आहे.
-प्रभाकर गाडे, अग्निशमन अधिकारी, नमुंमपा