पनवेल येथील तळोजा औद्योगिक वसाहतीत रविवारी पुन्हा आग लागली असून यामध्ये एका कामगाराचा होरपळून मृत्यू झाला आहे. याठिकाणी दोन महिन्यांपूर्वीही अशीच आग लागली होती. मात्र त्या स्फोटात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नव्हती. परंतु त्या घटनेची पुनरावृत्ती झाली असून यावेळी एका कामगाराचा यामध्ये जीव गेला आहे. तळोजा घोटगाव परिसरात असलेली एम. एस. आर. बायोटेक न्युट्रीशयन लि. या केमिकल कंपनीत आज सकाळी आठ वाजता पावडरच्या पॅकिंगचे व फील्टरचे काम सुरू होते. त्यावेळी अचानक फ्लिटर मशीनमध्ये स्फोट होऊन आग लागली. काही वेळातच या आगीने उग्र रुप धारण केले. याठिकाणी असणारे केमिकलचे ड्रम भरलेले होते.
आगीत होरपळून मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव रणजितकुमार सिंग (५५) आहे. ही आग आटोक्यात आणण्यास तळोजा अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले असून त्यासाठी त्यांना दोन तास लागले. या घटनेचा तपास तळोजा पोलिस स्टेशनचे सह.पोलीस निरीक्षक दिपक भिताडे करीत आहेत.प्राथमिक पाहणीनंतर कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात येईल असे त्यांनी सांगितले आहे. याबाबत कंपनी प्रशासनाकडून अद्याप कोणत्याही प्रतिक्रिया आली नसल्याचे त्यांनी सांगितले. पण सतत घडणाऱ्या आगीच्या तांडवामुळे तळोजा परिसरातील नागरिक भीतीच्या सावटाखाली वावरत आहेत.