गुन्हे दाखल करणार; दिवाळीसाठी अतिरिक्त दोन हवा प्रदूषण नोंदणी केंद्र
फटाके विक्रीवर अनेक बंधने आल्यामुळे दरवर्षीपेक्षा फटाके विक्रीचे स्टॉल कमी झाले असून आता मोठय़ा आवाजाचे व प्रदूषण करणारे फटाके वाजवणाऱ्यांवर नियमानुसार कारवाईचे संकेत पोलीस व प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिले आहेत. दिवाळीसाठी हवा प्रदूषणासाठी तात्पुरती अतिरिक्त दोन सेंटर करण्यात आली आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने फटाके वाजवण्याच्या वेळा निश्चित केल्याने व ग्रीन फटाक्यांना परवानगी दिल्याने फटाका व्यवसायाचे काय होणार याबाबत फटाका विक्रेत्यांमध्ये संभ्रमावस्था आहे. शहरात बेलापूर, नेरुळ, वाशी, कोपरखैरणे, तुर्भे, घणसोली, ऐरोली, दिघा या सर्वच विभागांत विक्रेत्यांनी तात्पुरते स्टॉल उभारले आहेत. वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजूला सर्वात जास्त दुकाने असून फटाका खरेदीकडे अनेकांनी पाठ फिरवली आहे. पालिका, पोलीस व अग्निशमन विभागाच्या परवानगीने शहरात तात्पुरते स्टॉल लागलेले आहेत. मात्र यात रेती व आग प्रतिबंधक व्यवस्था असणे आवश्यक आहे. परंतु अनेक ठिकाणी ही साधने दिसत नाहीत.
आता प्रदूषण नियंत्रण मंडळाने नवी मुंबई पोलिसांच्या मदतीने कानठळय़ा बसविणारे फटाके वाजविणाऱ्यांवर कारवाईचे संकेत दिले आहेत. न्यायालयाच्या निर्णयानुसार नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. हवेतील प्रदूषण मोजण्यासाठी सातत्याने सहा केंद्रे आहेत. दिवाळीसाठी अतिरिक्त दोन केंद्रे निर्माण करण्यात आली आहेत. नागरिकांनी शहरातील प्रदूषण कमी होण्यासाठी योग्य वेळेत व कमी आवाजाचे व फटाके वाजवावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
फटाके वाजवण्यासाठी वेळेच बंधन ठेवण्यात आले आहे. त्यामुळे फटाका खरेदीवर याचा परिणाम झाला आहे. यंदा व्यावसायिकांना तोटा सहन करावा लागण्याची शक्यता असल्याचे विक्रेते ज्ञानेश्वर शेळके यांनी सांगितले.
परिमंडळ-१चे पोलीस उपायुक्त डॉ.सुधाकर पाठार यांनी, नागरिकांनी दिवाळी उत्सव आनंदात साजरा करावा असे आवाहन करीत, कोणतीही दुर्घटना होणार नाही यासाठी फटाके फोडणाऱ्यांनी योग्य काळजी घ्यावी. ध्वनी व वायू प्रदूषणाबाबत अधिक काळजी घेऊन उत्सव साजरा करावा. न्यायालयाने ठरवून दिलेल्या वेळा न पाळल्या गेल्यास योग्य नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला.
प्रदूषण मंडळ वायू व ध्नवी प्रदूषणाबाबत योग्य ती खबरदारी घेत आहोत. फटाक्यांचा वापर कमी करावा, त्याऐवजी दिव्यांची सजावट अधिक करावी. शहरातील प्रदूषणाचा त्रास आपणालाच होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ते सहकार्य करावे. – डॉ.अनंत हर्षवर्धन,अधिकारी प्रदूषण नियंत्रण मंडळ, नवी मुंबई