उरण : सध्या बाजारात हंगामातील पहिले वालाचे पीक दाखल झाले आहे. त्यामुळे उरणच्या ग्रामीण भागात प्रसिद्ध असलेल्या रुचकर, मसालेदार पोपटीचे आकर्षण वाढू लागले आहे. वीकेंडला सध्या उपलब्ध असलेल्या वालाच्या शेंगाची पोपटी करण्याचे बेत ठरू लागले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दिवाळी संपली की मग चाहूल लागते ती थंडीची. हळूहळू हवेत गारवा निर्माण होऊ लागतो. दिवाळीच्या वेळेत भाताची कापणी झाली की लगेचच वाल, मटार, चवळी आदि कडधान्ये,पालेभाज्या शेतात पेरले जातात. ती पूर्ण बहरली की मग त्याची कापणी केली जाते अशा थंडीच्या मोसमात मित्रमैत्रिणींसोबत चटकदार पोपटीवर ताव मारण्याची मजा काही औरच असते. कोकणातील प्रसिद्ध परंपरा म्हणून किंवा जीवनशैलीचा एक भाग म्हणून पोपटीचे आयोजन केले जाते. त्यातही रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागात थंडीच्या दिवसात सर्वत्र पोपटीचे बेत रंगतात. जुन्या लोकांच्या मते पोपटी सर्वप्रथम अलिबागमध्ये करण्यात येऊ लागली. नंतर हळूहळू त्याचे लोण सर्वत्र पसरले. आजही जिल्ह्याचे महत्वाचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अलिबागचे शहरीकरण होत असले तरी ग्रामीण खाद्यसंस्कृतीचा भाग असलेली पोपटीचे आजही मोठ्या प्रमाणात सर्वत्र आयोजन केले जाते. उरण आणि रायगड परिसरातील वालाच्या पोपटाची चव ही अमेरिका, इंग्लंडसारख्या देशांतही पोहचली आहे. येथील परदेशी पाहुणे चिरनेर परिसरात या पोपटीचा आस्वाद घेण्यासाठी येत आहेत.

हेही वाचा…निवडणुकीनंतर कामांना गती, नागरी सुविधा कामांच्या निविदांसाठी नवी मुंबई महापालिकेची तांत्रिक समिती

बाजारात आलेले वाल की पावटे?

वालाचे पीक हे दोन प्रकारे घेतले जाते. एकतर भात कापणीनंतर वाल लावले जातात. पाण्यावरील वाल आणि दवावरील वाल असे दोन प्रकार आहेत. यातील थंडीत दवावर पिकविण्यात येणारे वाल जानेवारी अखेरपर्यंत बाजारात येणार असल्याची माहिती चिरनेर मधील शेतकरी प्रफुल्ल खारपाटील यांनी दिली. तर सद्याचे वाल हे पाण्यावरील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दवावर पिकणारे वाल हे चविष्ट आणि नैसर्गिक वाल असल्याचेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा…करंजा रेवस सागरी पूल मार्गिकेला ग्रामस्थांचा आक्षेप, १९८० च्या नियोजन आराखड्यानुसार जोड मार्गिका देण्याची मागणी

पोपटी कशी करतात?

पोपटी शाकाहारी आणि मांसाहारी अशी दोन्ही प्रकारची असते. शेताच्या बांधावर भांबुर्डीचा पाला एका मातीच्या मडक्यात भरला जातो. त्यात वालाच्या, मटारच्या शेंगा, मीठ आणि पुन्हा वर पाला असे थर रचतात. यासह चिकन, अंडीही ठेवून मडक्याचे तोंड गच्च बांधले जाते. एखादी चांगली जागा बघून तेथे मडके जमिनीवर उलटे ठेवतात. या मडक्यावर, आजूबाजूला भाताची सुकलेली पेंडी, शेतातील सुका पालापाचोळा, गवत टाकून आग पेटवली जाते. पाण्याचा अजिबात वापर होत नाही. आगीच्या वाफेवर पोपटी शिजते.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: First crop has entered the market increasing appeal of spicy papati in uran sud 02