पनवेल : शेजारील नवी मुंबई महापालिकेने इंग्रजी माध्यमाबरोबर सीबीएसई शाळांवर भर दिलेला असल्याने पनवेल महापालिकेनेही आता पहिली इंग्रजी माध्यमाची शाळा या शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्याचे ठरवले आहे. यासाठीची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. कनिष्ठ शिशू वर्गापासून ही शाळा सुरू होणार असून ४० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार असल्याचे पालिकेने बुधवारी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले आहे. या शाळेत प्रवेशासाठी १५ जूनपर्यंत अर्ज करता येतील, असे आवाहन करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पनवेलमध्ये काही महिन्यांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा जनता दरबार झाला होता. या वेळी त्यांना महापालिका आयुक्तांना शैक्षणिक धोरणात बदल करण्याची गरज व्यक्त करीत इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरू करण्याबाबत सूचित करण्यात आले होते. त्यानंतर महापालिका आयुक्तांनी तशा हालचाली सुरू करीत ही पहिली इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करण्यात येत आहे.

प्रवेश अर्ज भरत असताना बालकाचे जन्म प्रमाणपत्र आवश्यक असणार असून रहिवासी पुरावा म्हणून आधार कार्ड, पालकांचे पासपोर्ट, मतदार ओळखपत्र, वीज देयक, टेलिफोन देयक, पाणीपट्टी, वाहन चालविण्याचा परवाना, रेशनिंग कार्ड, राष्ट्रीयीकृत बँकेचे पासबुक, भाडेतत्त्वावर राहणाऱ्या पालकांच्या बाबतीत दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृत भाडे करारनाम्याची प्रत यापैकी कोणताही एक पुरावा गृहीत धरला जाणार आहे. कनिष्ठ शिशू वर्गाच्या प्रवेशासाठी मुलाचा जन्म १ जुलै २०२७ ते ३१ डिसेंबर २०१८ या दरम्यान झालेला असावा, असेही पालिकेने कळवले आहे.

२३ जून रोजी सोडत

प्रवेश अर्ज भरण्याचा अंतिम मुदत १५ जून सायंकाळी ६ वाजेपर्यंत देण्यात आली आहे. सोडत पद्धतीने ४० विद्यार्थ्यांचा प्रवेश अंतिम होणार असून २३ जून रोजी दुपारी ३ वाजता सोडत काढली जाणार आहे. प्रवेश अर्ज पीर करमअली शाह उर्दू शाळा क्रमांक १०, पाटकर वाडा येथे अर्ज मिळतील.

पनवेल महानगरपालिकेमार्फत या वर्षीपासून इंग्रजी माध्यमाच्या शाळेचा कनिष्ठ शिशू वर्ग सुरू करण्यात आला आहे. महापालिका क्षेत्रातील नागरिकांनी लवकरात लवकर आपल्या पाल्यांचा प्रवेश निश्चित करण्यासाठी प्रवेश अर्ज भरावेत.

– गणेश देशमुख, आयुक्त, पनवेल महानगरपालिका