लोकसत्ता प्रतिनिधी

नवी मुंबई : डिसेंबर महिन्यात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील दोन धावपट्टींपैकी एका धावपट्टीवर विमान यशस्वीरित्या उतरवण्यात आले. याच दिवशी सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांनी एप्रिल महिन्यात विमानतळ सुरू करण्याची घोषणा केली. मात्र रविवारी अदानी समूहाचे सर्वेसर्वा गौतम अदानी यांनी जून महिन्यात विमानतळाचे उद्घाटन होईल असे जाहीर केले. विमानतळाच्या पहिल्या टप्याचे ८५ टक्क्यांपेक्षा अधिक काम पूर्ण झाल्याने चार टप्यांपैकी पहिला टप्पा जून महिन्यात पूर्ण करुन या विमानतळाचे सुरक्षेचे हस्तांतरण लवकरच केंद्रीय औद्योगिक सूरक्षा दलाकडे ( सीआयएसएफ) केले जाण्याच्या हालचाली सुरू आहेत.

नुकताच राज्याचा अर्थसंकल्प जाहीर करताना अर्थमंत्री अजित पवार यांच्या भाषणात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाचा उल्लेख आवर्जून करण्यात आला. या विमानतळाचे काम ८५ टक्यांहून अधिक झाल्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी जाहीर केले. मागील आठवड्यात शुक्रवारी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनीसुद्धा विमानतळ प्रकल्पाच्या ठिकाणी जाऊन कामाचा आढावा घेतला.

डिसेंबर महिन्याच्या शेवटी धावपट्टीची चाचणी यशस्वी झाल्यानंतर ४० दिवसांचा काळ विविध परवानग्यांच्या प्रक्रियेत जाणार असे गृहित धरुन सिडको आणि अदानी कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे १७ एप्रिल ही तारीख जाहीर केली होती. रविवारी अदानी समुहाचे प्रमुख गौतम अदानी यांनी विमानतळाच्या कामाची पाहणी केल्यावर उद्घाटनाला जून महिना उजाडेल असे सांगितल्याने सिडको या सरकारी कंपनी आणि अदानी या खासगी कंपनीमध्ये एकवाक्यता नसल्याचे जगजाहीर झाले.

दरम्यान, भारतीय विमानतळ प्राधिकरण आणि एरोनॉटिकल इन्फॉर्मेशन पब्लिकेशन यांच्यामार्फत देशपातळीवर विमान वाहतूक करणाऱ्या वैमानिकाला नवी मुंबई विमानतळावर विमान सूरक्षित उतरण्यासाठी विमानतळावरील कॉर्डिनेट्स कुठे आहेत हे समजण्यासाठी सूचना पत्र आणि परवान्याची प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती सूत्रांकडून समजते. परंतु अजूनही आंतरराष्ट्रीय विमानतळाचे एरोनॉटिकल इन्फॉर्मेशन पब्लिकेशनची आणि विविध परवानाची प्रक्रिया सुरू असल्याचे सुद्धा नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर सांगण्यात आले.

विमानतळ सुरू होईपर्यंतच्या कामाचे टप्पे

  • अदानी कंपनीचे ७४ टक्के भागीदारी आणि सिडकोची २६ टक्यांची भागीदारातून हे विमानतळ उभारले जात आहे.
  • सुरुवातीला विमानतळाच्या जमीन संपादनासाठी सिडकोने ३ हजार कोटी रुपयांहून अधिक रक्कम या प्रकल्पात गुंतवली. त्यानंतर एसबीआय कंपनीकडून २० हजार कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केल्यानंतर अदानी समूहाने या विमानतळाच्या कामाला वेग दिला.
  • सध्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल सुरू करण्यासाठी विविध परवानग्या घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. परवानगी मिळेपर्यंत प्रकल्पाची इतर कामे पूर्ण केली जातील.
  • उद्घाटनापूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर या तयार टर्मिनलचे सादरीकरण आणि त्यानंतर उदघाटन केले जाईल. त्यानंतर सूरक्षेसाठी विमानतळ केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाला हस्तांतरित केले जाईल.
  • प्रत्यक्षात विमानतळ सुरू करण्यापूर्वी प्रवासी आल्यावर विमानतळावरील संचलनाची रंगीत तालीम घेतली जाईल. विमानतळ सुरू करण्यासाठी परवाना मिळाल्यानंतर या विमानतळातून प्रत्यक्षात विमानोड्डाण केले जाईल.