उरण : मुंबईच्या ससून बंदराला पर्याय ठरलेल्या उरणच्या करंजा बंदरातील मासळीच्या निर्यातीत वाढ झाली आहे. गेल्या आठ महिन्यांत ३०० कोटी पेक्षा अधिकच्या मासळीची निर्यात झाल्याचे निर्यातदारांचे म्हणणे आहे. या वाढत्या निर्याती बरोबरच मासळीची आवकही वाढली आहे. पण व्यापाऱ्यांनी मच्छीमारांना पैसे देण्यास टाळाटाळ करण्यास सुरुवात केल्याने मच्छीमारांचे पैसे थकित आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

करंजा बंदर मासळीच्या निर्यातीसाठी रायगड जिल्ह्यासह स्थानिक हजारो मच्छीमारांना करंजा मच्छीमार बंदर फायदेशीर ठरत आहे. या बंदरातून २५०-३०० कोटी रुपयांची मासळी निर्यात करण्यात आली. दरम्यान येथील मच्छीमारांनी आपल्या परिचित स्थानिक दलालांवर विश्वास टाकून लाखो रुपयांचे मासळीचे व्यवहार केले आहेत. सुरुवातीला त्यांनी मच्छीमारांना पैसे दिले. त्यानंतर व्यापाऱ्यांनी पैसे देण्यास टाळाटाळ करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे मासळीची विक्री करूनही मच्छीमारांना त्यांचे पैसे वेळेवर मिळत नसल्याच्या तक्रारी ही वाढल्या आहेत.

मासळीची विक्री करतांना मध्यस्थी असलेल्यांची वेळेत पैसे न दिल्याने काही मच्छिमारांना मासळी विक्रीचे पैसे मिळाले नसावेत अशी माहिती करंजा येथील स्थानिक निर्यातदार गणेश नाखवा यांनी दिली. मासळीचे पैसे न मिळाल्याने मच्छीमारांची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच काही मच्छीमारांनी उरण पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पैसे वेळेत न मिळाल्याने मच्छिमारावर आर्थिक संकट आले असल्याचे मत मच्छीमारांनी व्यक्त केले.

करंजा येथील मासळी व्यवहारात मासळीच्या विक्रीचे पैसे न मिळाल्याची तक्रार पोलिसांत आली आहे. त्याची शहानिशा केली जात आहे. यात तथ्य आढळल्यास पुढील कारवाई केली जाईल. जितेंद्र मिसाळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, उरण पोलीस ठाणे.

ऐन होळीच्या सणातच खासगी सावकारांकडून कर्ज काढून, दागदागिने गहाण, विक्री करून खलाशांचे पगार, देणी चुकविण्याची वेळ अनेक मासळी व्यावसायिकांवर आली आहे.