पालिकेची कारवाई थंडावल्याने अतिक्रमण

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पनवेल : कोळीवाडा परिसरात मासळी बाजार उपलब्ध करून दिल्यानंतरही आता पुन्हा उरण नाक्यावर अतिक्रमणे करून मासेविक्री सुरू आहे. पनवेल महापालिकेची कारवाई थंडावल्याने येथे फेरीवाल्याने पुन्हा बस्तान बसविले आहे.

उरण नाका म्हणजे विविध प्रकारचे मासे मिळण्याचे पनवेलमधील एकमेव ठिकाण. या ठिकाणी रस्त्यावरच बेकायदा विक्री होत असे. त्यामुळे येथे वाहतूक कोंडीची समस्याही निर्माण होत होती. पनवेल महापालिका अस्तित्वात अाल्यानंतर तत्कालीन आयुक्त सुधाकर शिंदे यांनी या विक्रेत्यांवर कारवाईच बडगा उगारला होता. वारंवार कारवाई होत असल्याने तसेच या मासेविक्रेत्यांना कोळीवाडा परिसरात बाजार उपलब्ध करून दिल्याने हा परिसर मोकळा झाला होता.

कोळीवाडा परिसरात आधुनिक सोयी सुविधांनी सुसज्ज असे मासळी मार्केट बांधण्यात आले आहे. २४ तास पाण्याची सोय, मासे साठवणुकीसाठी शीतकपाटे तसेच स्वच्छतागृह बांधली गेली आहेत. स्वतंत्र मच्छी मार्केट असूनही या कोळी महिला आता पुन्हा रस्त्यावर विक्रीसाठी बसत आहेत.

उरण नाका हा परिसर पनवेलमधील मोक्याचे ठिकाण असल्याने फेरीवाल्याने पुन्हा बस्तान बसविले आहे. त्यामुळे पुन्हा वाहतुकीचे प्रश्न निर्माण झाले आहेत. ही जागा पालिकेने पार्किंगसाठी राखीव ठेवली आहे. त्या जागेतही या महिला मासेविक्रीसाठी बसत आहेत.

रस्त्यावर अतिक्रमण करून त्या जागेचा वापर विक्रीसाठी किंवा इतर काही करण्यासाठी होत असेल तर कारवाईचे आदेश प्रभाग अधिकाऱ्यांना दिलेले आहेत. असे असताना अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असेल तर पालिकेच्या माध्यमातून कारवाई केली जाईल. अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात येईल.

– जमीर लेंगरेकर, उपायुक्त, पनवेल महानगरपालिका