उरण : मुंबईच्या ससून बंदराला पर्याय म्हणून उरणच्या करंजा येथे नवे मच्छीमार बंदर उभारण्यात आले आहे. मात्र दोन वर्षांच्या आतच या बंदरात गाळाची समस्या निर्माण होऊ लागली आहे. त्यामुळे भरती-ओहटीच्या वेळी मासेमारी बोटी हाताळण्यात अडथळे निर्माण होत आहेत. महाराष्ट्र फिशरमन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मार्तंड नाखवा यांनी महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाकडे गाळ काढण्याची मागणी केली आहे.

१५ ऑगस्ट पासून करंजा मच्छीमार बंदरातून मासळी खरेदी-विक्री सुरू झाली आहे. या नऊ महिन्यांच्या कालावधीत बंदरातून ३०० कोटीं पेक्षा अधिक मासळीची निर्यात झाली आहे. ही मासळी अमेरिका, चीन तसेच आशिया व युरोप खंडातील अनेक देशात निर्यात करण्यात आली आहे. तर दुसरीकडे मासळी बंदर आणि त्यावर आधारित विविध प्रकल्पांमुळे करंजा परिसरात विविध प्रकारच्या छोट्या-मोठ्या लघु उद्योगांत वाढ होत चालली आहे. त्यामुळे येथील स्थानिक बेरोजगारांना बऱ्यापैकी रोजगारही उपलब्ध होऊ लागला आहे. त्यामुळे येथील मच्छीमारांना लाभ झाला आहे. त्याच बरोबरीने स्थानकांच्याही व्यवसायात भर पडली आहे.

राज्यातील सात सागरी जिल्ह्यांतील सर्वात मोठे मच्छीमार करंजा गाव म्हणून ओळखले जाते. राज्यातील सर्वाधिक सुमारे ६५० मच्छीमार बोटी याच करंजा गावात मासेमारी करतात. राज्यातील सर्वात मोठी मच्छीमार सहकारी संस्थांही करंजातच आहे. वार्षिक सुमारे १०० कोटींची उलाढाल असलेल्या या मच्छीमार संस्थेच्या माध्यमातून डिझेलमागे एक पैसा आणि बर्फाच्या विक्रीमागे एक रुपया विकास निधी वसुल करुन शाळा, हॉस्पिटलची उभारणी केली आहे. अशा सर्वाधिक मासेमारी करणाऱ्या करंजा मच्छीमारांच्या शेकडो बोटी मासळी उतरविणे, विक्रीसाठी मुंबईतील एकमेव ससुनडॉक बंदराच्या आश्रयाला जात होते. त्यामुळे ससुनडॉक बंदरावरील वाढता ताण लक्षात घेऊनच करंजा येथेच उपयुक्त जागेत सुमारे २०० कोटी खर्चाचे एक हजार मच्छीमार बोटी क्षमतेचे अद्यावत करंजा मच्छीमार बंदर उभारण्यात आले आहे. या बंदरात आमदार महेश बालदी यांच्याहस्ते १५ ऑगस्ट पासून मासळी बाजार सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे हे करंजा बंदर हजारो मच्छीमारांसाठी वरदान ठरले आहे.

करंजा मच्छीमार बंदर परिसरात सध्या गाळ साचल्यामुळे तेथे ड्रेजिंग करण्याची अत्यंत तातडीची गरज निर्माण झाली आहे. साचलेल्या गाळामुळे बंदरात मासेमारी नौका सहजपणे ये-जा करू शकत नाहीत. विशेषतः भरती-ओहोटीच्या वेळी पाण्याची पातळी कमी असल्यामुळे बोटी अडकल्याची वा आपटल्याच्या घटना घडत आहेत. ही परिस्थिती मच्छीमार बांधवांच्या जीवितास व नौकांच्या सुरक्षिततेस गंभीर धोका निर्माण करणारी आहे. लवकरात लवकर ड्रेजिंग करण्यात आले नाही. तर बंदरात मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे, करंजा मच्छीमार बंदर येथे तातडीने ड्रेजिंगचे काम करावे जेणेकरून मासेमारी व्यवसाय सुरळीत व सुरक्षित पद्धतीने सुरू राहील, अशी मागणी फिशरमन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मार्तंड नाखवा यांनी केली आहे.

करंजा बंदरातील गाळ काढण्याची मागणी मच्छीमारांनी केली आहे. त्याचा प्रस्ताव तयार करून मत्स्यव्यवसाय विभागाला देण्यात येणार आहे. यात प्रथम गाळाची तपासणी केली जाईल त्यानंतर येणाऱ्या अहवाल वरून गाळ काढण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल. -सुधीर देवरे,कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड