उरण : हवामानातील सातत्याने होणारे बदल, समुद्रातील वाढता मानवी हस्तक्षेप आणि जलप्रदूषणामुळे दिवसेंदिवस माशांचा साठा कमी होत चालला आहे. कधीकाळी राज्याच्या सागरी जलाधिक्षेत्रात मुबलक मत्स्यसंपदा होती. पण तिच्यावर उपजीविका करणारे लाखो मच्छीमार मागील काही वर्षांपासून मासळीच्या दुष्काळाशी झुंजत लागत आहेत. त्यामुळे मासळीच्या किरकोळ दरातही ३० टक्क्यांची वाढ झाल्याने खवय्यांच्या खिशालाही चाट बसत आहे.
अरबी समुद्र तसेच बंगालच्या उपसागरातील काही भागांमध्ये झिरो ऑक्सिजन झोन निर्माण झाले आहेत. त्यामुळे अशा भागांतून काही प्रजातींचे मासे इतरत्र स्थलांतरित होत आहेत. घोळ,जिताडा, शेवंड, बोंबील, मांदेली, कर्ली, कोळंबी, पापलेट, सुरमई तसेच खेकडे याचबरोबर इतर अनेक प्रजातींचे समुद्रातील अस्तित्व मागील काही वर्षांपासून कमी झाले आहे. बेकायदा पर्ससीन, एलईडी मासेमारीचा होणारा अतिरेक याचा मोठा परिणाम पारंपरिक मच्छीमारांच्या आर्थिक उत्पन्नावर झाला असल्याचे मच्छीमारांकडून सांगितले जात आहे. तसेच राज्याच्या सागरी हद्दीत घुसखोरी करून कोट्यवधींची मत्स्य संपदा हडप करणाऱ्या कर्नाटक, गुजरात राज्यांतील हायस्पीड ट्रॉलर्सनींही राज्यातील पारंपरिक मच्छीमारांचे जगणे कठीण करून टाकले आहे.
समुद्रातील वाढते जलप्रदूषण, अनियंत्रित परराज्यांतील यांत्रिक तसेच यंत्रचलित मासेमारी नौकांवर प्रतिबंध घालाण्याची व अवैध पर्ससीन, एलईडी मासेमारीवरील बंदी केवळ कागदावरच राहिली आहे. मासळीची घटती उत्पादकता आणि नौकांची कमी होणारी संख्या यामुळे मासेमारी व्यवसायावर गंडांतर आले असल्याचे मच्छीमारांचे म्हणणे आहे.
सागरी मासेमारीला तर मुळातच अनेक मर्यादा आहेत. त्यातच समुद्रातील वाढत्या प्रदूषणामुळे अनेक प्रजातींचे मासे मोठ्या प्रमाणावर मृत्युमुखी पडत आहेत तर काही प्रजाती स्थलांतर करीत आहेत. जागतिक तापमान वाढीमुळेही माशांसह समुद्रातील एकंदरीतच जीवसृष्टीवरच अनिष्ट परिणाम होत आहे.