वाफाळलेले मासे. त्यांना टोमॅटो, आले आणि लसणाची चव, गरम मसाल्याचा तडका. त्यावर मैद्याचा वा गव्हाच्या पिठापासून तयार केलेले ‘रोल’ म्हणजेच ‘प्रॉन्झ फ्रॅन्की’ची लज्जत नवी मुंबईतील घणसोलीत ‘फिशी फिस्ट’ या छोटेखानी हॉटेलात चाखायला मिळते. फ्रॅन्की हा खाद्यपदार्थ तसा सगळीकडे उपलब्ध असतो. साधारणपणे त्यात शाकाहारी, शेझवान, चिकन आणि डबल रोल चिकन फ्रॅन्की मिळते. ‘फिशी फिस्ट’मध्ये फ्रॅन्कीमध्ये मासे असतात. ‘फिशी फिस्ट’चे हे वेगळेपण आहे. खवय्यांची इथे त्यासाठी झुंबड उडालेली असते.

मूळचा पंढरपूरचा सागर घोडके याने अभियांत्रिकीचे शिक्षण मध्यावरच सोडून व्यवसायाचा मार्ग पकडला. यात दागिने आणि पाककलेतील व्यवसाय असे दोन पर्याय म्हणून हजर होते.

वडिलांचा वाहतुकीचा व्यवसाय सोडून २०१५ मध्ये सागरने घणसोलीत छोटेसे हॉटेल थाटले. खवय्यांना काही तरी वेगळी चव देण्याचे त्याने मनाशी पक्के केले होते. यासाठी त्याने फ्रॅन्की या प्रकारात माशांवर भर दिला. माशांमध्ये विविधता देण्याकडे सागरने भर दिला. ‘फिशी’मध्ये बांगडा थाळी, सुरमई थाळी, कोळंबी, मॅन्च्युरियन, टिक्का, कोळंबी तंदुरी, बांगडा तंदुरी, टिक्का बिर्याणी, नुडल्स या पदार्थाची चव येथे चाखायला मिळते.

ताजे मासे मागवले जातात. पदार्थ बनविण्यासाठी कोळशाच्या भट्टीचा वापर केला जातो. यासाठी तीन प्रशिक्षित गढवाली स्वयंपाकी ठेवण्यात आले आहेत. यात विविधता जपली जाते, असे सागर आवर्जून नमूद करतो. माशांच्या आमटीला (करी) खवय्यांची मोठी मागणीअसते. ती बनविण्यासाठी नारळाचा वापर केला जातो. मसाल्याच्या दर्जावर विशेष भर दिला जातो.

ग्राहकांना पितळी ताटात खाद्यपदार्थ दिले जातात. पार्सलसाठीही मोठी मागणी असते. महाविद्यालयीन तरुणांची पसंतीही खाद्यपदार्थाना मिळत आहे.

फिशी फिस्ट

  • शॉप नं-१० प्लॉट नं-२० सेक्टर-२०.घणसोली
  • वेळ- सकाळी ११ ते ३ वा.
  • सायंकाळी ७ ते ११ वा.