पूनम सकपाळ, लोकसत्ता

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नवी मुंबई : आवक घटल्याने वाढलेले कांदा दर आयात कांद्यामुळे घाऊक बाजारात कांदा दर ६० ते ७० च्या घरात स्थिर आहेत. मात्र यावर्षी गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत कांदा आवक प्रचंड घटल्याचे समोर आले आहे. ३० लाख क्विंट्ल असलेली कांदा आवक यावर्षीत फक्त ७ लाख क्विंट्लइतकीच झाली आहे. पावसाचा प्रचंड मोठा फटका कांदा उत्पादकांना बसला आहे.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा-बटाटा बाजारात जानेवारी ते एप्रिल या कालावधीत कांद्याची मोठी आवक होत असते.  यावर्षी १५ मार्चनंतर करोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला. टाळेबंदीत सुरुवातीला एपीएमसी बाजार काही निवडक वेळेतच सुरू ठेवण्यात आला. संसर्ग वाढल्यानंतर एक आठवडा बाजार समित्या बंद ठेवण्यात आल्या होत्या. त्यांनतर मर्यादित शेतमाल बाजारात दाखल होत होता. या कालावधीत कांदा-बटाटा बाजारात १०० गाडी आवक करण्याची परवानगी होती, मात्र करोनाकाळात वाहतुकीवरदेखील परिणाम झाल्याने आवक कमी होत गेली. त्यानंतर ऑक्टोबर व नोव्हेंबरमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे कांदा पिकांचे प्रचंड नुकसान झाले. साठवणुकीतील कांदाही खराब झाला. त्यामुळे जुना कांदा व नवीन कांदा आवक घटली.  एप्रिल २०१८ ते मार्च २०१९ मध्ये ३९ लाख ३६ हजार १२९ क्विंट्ल तर एप्रिल २०१९ ते मार्च २०२० या काळात ३३ लाख ८५४ क्विंटल आवक होत होती. या वर्षी आणि मार्च ते ऑक्टोबर २०२० पर्यंत फक्त ७ लाख ८७ हजार ६५६ क्विंट्ल  आवक झाली आहे. २५लाख १३ हजार १९८ क्विंट्ल इतकी आवक घटली आहे.

सरासरी दर मात्र कमी

यावर्षी पावसामुळे नवीन व जुन्या कांद्याचे प्रचंड नुकसान झाल्याने आवक मोठय़ा प्रमाणात कमी झाली असली तरी मागील वर्षीच्या तुलनेत कांद्याचे सरासरी दर मात्र कमी राहिले. मागील वर्षी घाऊक बाजारात प्रतिकिलोला शंभरी तर किरकोळ बाजारात १५० रु. गाठली होती. एप्रिल २०१८ ते मार्च २०१९ मध्ये कांद्याचे सरासरी दर प्रतिक्विंट्ल ९७० रुपये तर एप्रिल २०१९ ते मार्च २०२० मध्ये २८०४ रुपयांवर पोहचले होते. यावर्षी सरासरी कांदा दर प्रतिक्विंट्ल २ हजार ३६५ रुपयांपर्यंत गेला आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Five percent less onion supply dd70