पनवेल ः राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सोमवारी दुपारी साडेतीन वाजता खारघर येथे प्रचारसभा होणार आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस हे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी खारघर येथे येत आहेत. मात्र फडणवीस यांच्या सभेला काही तास शिल्लक असताना शिवसेना ठाकरे गटाच्या स्थानिक नेत्या लीना गरड यांनी पाच प्रश्नावर उपमुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करण्याचे आव्हान समाजमाध्यमांवर दिल्याने सभेपूर्वीच खारघरमध्ये राजकीय वातावरण तापले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विशेष म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारात पनवेल महापालिका क्षेत्रातील सिडको वसाहतींमधील साडेतीन लाख मालमत्ताधारकांचा दुहेरी कराचा मुद्दा निवडणुकीत सर्वाधिक चर्चेत आला आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाच्या शिवसेनेच्या व महायुतीच्यावतीने श्रीरंग बारणे हे तीसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मावळ मतदारसंघात बारणे हे पनवेलकरांना सहज उपलब्ध होत नसल्याची टीका त्यांच्यावर केली जात आहे. मागील अनेक वर्षे संसदरत्न पुरस्कार बारणे यांना मिळाल्याने पुन्हा तीसऱ्यांदा बारणे यांना निवडून देण्याचे आवाहन भाजप व सेनेकडून केले जात आहे. मात्र खारघर वसाहतीमधून मागील महिन्यात ठाकरे गटात प्रवेश केलेल्या माजी नगरसेविका लीना गरड यांनी पाच प्रश्नावर खारघरमध्ये प्रचारासाठी आलेल्या उपमुख्यमंत्री फडणवीस, बारणे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी असे आवाहन केले आहे.

हेही वाचा – महाराष्ट्र देशातील असंतोषाचा जनक ; उद्धव ठाकरे यांचा भाजप, मोदींवर हल्लाबोल

हेही वाचा – पनवेल: आधी नुकसान भरपाई, नंतर घरांचा ताबा; तळोजातील सिडकोच्या लाभार्थींची आर्जवी

गरड यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांमध्ये सिडको वसाहतीमधील मालमत्तांना ग्रामपंचायतींप्रमाणे ६४ टक्के कर सवलत का लागू केली नाही, असा प्रश्न उपस्थित केला आहे. दूसरा प्रश्न मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील पाचशे चौरस फुटांच्या घरांना मालमत्ता करातून माफी दिली गेली, पनवेल महापालिकेला तो निकष का लावला नाही. राज्य सरकारने विशेष प्रकल्पांतर्गत पलावा सिटीला ६६ टक्के करसवलत दिली तर सिडको हद्दीतील मालमत्तांना ती सवलत का दिली नाही. चौथा प्रश्न एक सुविधा एक सेवाकर असताना दुहेरी कर पनवेल महापालिका क्षेत्रात का लागू केला. पाचवा प्रश्न इतर महापालिकेप्रमाणे पनवेल महापालिकेत अभय योजना लागू केली नाही. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकार ही योजना जाहीर करणार का.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Five questions from the shivsena thackeray group on behalf of panvel people to the devendra fadnavis before meeting ssb