ठाणे-बेलापूर मार्गावर पावणे येथे एका ट्रकने रस्ता ओलांडणाऱ्या  पाच-सहा पादचारी महिलांना धडक दिली. या अपघातात एक महिला मृत्युमुखी पडली असून दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात पावणे अग्निशमन केंद्राच्या समोर बेलापूर-ठाणे मार्गावर घडला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बुधवारी सकाळी सव्वानऊच्या सुमारास हिरालाल गुप्ता हा ट्रकचालक भाजी घेऊन ठाण्याच्या दिशेने वेगात निघाला होता. पावणे-तुर्भे उड्डाणपूल उतरल्यावर उतारावर त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले. दुर्दैवाने नेमके याच वेळेस एमआयडीसीत काम करणाऱ्या पाच-सहा महिला रस्ता ओलांडत होत्या. याच महिलांच्या अंगावर ट्रक गेली. त्यात सोनाली गोळवकर या २५ वर्षीय युवतीसह अन्य दोन महिला गंभीर जखमी झाल्या. नेमके याच मार्गावरून एपीएमसीमधील सुरक्षा अधिकारी भीमराव पाटील जात होते. त्यांनी जखमी महिलांना स्वतःच्या गाडीने वाशी येथील रुग्णालयात दाखल केले. तेथेच सोनाली हिला मृत घोषित केले गेले. सोनालीचे पुढील आठवड्यात लग्न होणार होते, अशी माहिती एका नातेवाईकाने दिली.

हेही वाचा >>>नवी मुंबई : बुधवारी शहराला ४०० एमएलडी पाणी पुरवठयाचा पालिकेचा दावा….दुरुस्तीनंतरही पाणीपुरवठा विस्कळीत असल्याची नागरिकांची ओरड

या प्रकरणी बेदरकारपणे आणि निष्काळजीपणे वाहन चालवून मृत्यूस कारण ठरल्याप्रकरणी ट्रकचालक हिरालाल याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांनी दिली.