नवी मुंबई : दरवर्षी नवी मुंबई महपालिकेच्या वतीने शहरातील अनधिकृत शाळांची यादी जाहीर करण्यात येते, मार्चमध्ये ही यादी जाहीर केली जाते. पंरतु यंदा मे महिन्यात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यंदा नवी मुंबई शहरात पाच अनधिकृत शाळांची यादी जाहीर करण्यात आली असून पाचही शाळा या इंग्रजी माध्यमाच्याच आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> नवी मुंबई : एपीएमसीत जुन्नर हापुस दाखल होण्यास सुरुवात

सध्या पालकांचा कल हा मराठीपेक्षा इंग्रजी, सीबीएसई अशा शाळांकडे आहे. प्रत्येक पालकांना आपल्या मुलाने इंग्रजी माध्यमातूनच शिक्षण घ्यावे, असा आग्रह असतो. त्यामुळे दिवसेंदिवस इंग्रजी माध्यमाला अधिक महत्त्व प्राप्त होत आहे. याचाच गैरफायदा घेऊन नवी मुंबई शहरात इंग्रजी माध्यमाच्या अनधिकृत शाळांची यादी वाढत आहे. मागील वर्षी एकूण १० अनधिकृत शाळा होत्या, त्यापैकी सात शाळा इंग्रजी माध्यमाच्या होत्या. यंदा पाच शाळा अनधिकृत जाहीर झाल्या असून यामध्ये सर्व शाळा इंग्रजी माध्यमाच्याच आहेत.

हेही वाचा >>> नवी मुंबई: अवैध वाहतूक करणाऱ्या बसवर आरटीओची करडी नजर

बेलापूर येथील इस्माइल एज्युकेशन ट्रस्टचे अल मोमिन स्कूल, आर्टिस्ट व्हिलेज, ग्लोबल एज्युकेशन ट्रस्टचे नेरुळमधील इकरा इस्लामिक स्कूल ॲण्ड मक्तब, द आटपाडी एज्युकेशन सोसायटीचे द ऑर्चिड इंटरनॅशनल स्कूल (सीबीएसई), सीवूड, सेक्टर-४०, ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ, किसननगर नं. ३, ठाण्याचे सरस्वती विद्यानिकेतन स्कूल, सेक्टर -५, घणसोली (न्यायप्रविष्ट प्रकरण), इलिम फुल गोस्पेल ट्रस्टचे इलिम इंग्लिश स्कूल, आंबेडकर नगर, रबाळे या शाळा अनधिकृत आहेत.  महापालिकेने ही अनधिकृत शाळांची यादी जानेवारी-फेब्रुवारीमध्येच प्रसिद्ध करणे अपेक्षित होते. विद्यार्थी आणि पालक प्रवेशप्रक्रिया करताना याबाबत अनभिज्ञ असतात. त्यामुळे दरवर्षी प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच या अनधिकृत शाळांची यादी जाहीर करावी, अशी मागणी होते, परंतु दरवर्षी प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच यादी प्रसिद्ध होते, त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाते.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Five unauthorised english medium schools in navi mumbai city zws