नवी मुंबई: नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६३ व्या वर्धापन दिनानिमित्त महापालिका मुख्यालयात महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. यावेळी ध्वजारोहणानंतर राष्ट्रध्वजाला वंदन करीत राष्ट्रगीत व तद्नंतर १९ फेब्रुवारी २०२३ पासून महाराष्ट्र शासनाने अंगीकृत केलेले महाराष्ट्राचे राज्यगीत ध्वनीप्रसारित करण्यात आले.
याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले व संजय काकडे तसेच विभागप्रमुख, अधिकारी – कर्मचारीवृंद, अग्निशमन दलाचे जवान, अतिक्रमण विभागाचे पोलीस अधिकारी-कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा… उसाचा रस पिणे पडले महागात, नजर हटी दुर्घटना घटी; १० मिनिटात रिक्षा चोरी
कामगार दिनाचे औचित्य साधून प्रत्येक कामगार दिनी नवी मुंबई महानगरपालिकेतील विविध विभागांत उत्तम काम करणा-या कामगारांना सन्मानीत करण्यात येते. त्यानुसार आयकॉनिक महानगरपालिका मुख्यालय इमारतीची अतिशय उत्तम स्वच्छता राखणा-या १० स्वच्छताकर्मींना प्रातिनिधीक स्वरूपात आयुक्तांच्या शुभहस्ते सन्मानीत करण्यात आले.
महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून आयकॉनिक वास्तू म्हणून ओळखल्या जाणा-या नवी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालय इमारतीस ३० एप्रिल ते २ मे २०२३ या कालावधीत विद्युत रोषणाई करण्यात आली असून मुख्यालय इमारतीसमोर हुतात्मा चौकाची प्रतिकृती उभारण्यात आलेली आहे. ती पाहण्यासाठी व विद्युत रोषणाई आणि प्रतिकृतीसमवेत सेल्फी काढण्यासाठी नागरिक या परिसराला मोठ्या संख्येने भेट देत आहेत.