पातळगंगाने इशारा पातळी ओलांडली; गाढी नदीच्या प्रवाहात वाढ झाल्याने नदीकाठच्या गावांना प्रशासनांकडून धोक्याचा इशारा

पनवेल : बुधवारी दिवसभर सुरू असलेल्या पावसामुळे पनवेलमधून जाणाऱ्या पातळगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे तर गाढी नदीचा प्रवाहही वाढला आहे. गुरुवारी अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे या दोन्ही नद्या धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता असल्याने पनवेल शहर व तालुक्यात पुराचा धोका वाढला आहे. प्रशासनानेही धोक्याचा इशारा दिला आहे.

दरम्यान हवामान विभागाने बुधवारी रात्री माथेरानच्या डोंगररांगांत अतिवृष्टीची शक्यता वर्तवली आहे.  या दरम्यान रात्री १० वाजून ५७ मिनिटांनी मोठी भरती असून साडेतीन मीटर उंचीच्या लाटा किनारपट्टीला आदळणार आहेत. पाऊस व भरती एकाच वेळी येणार असल्याने पनवेलमधून जाणाऱ्या गाढी, पातळगंगा नद्यांना पूर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे पालिका पशासनाने गुरुवारी सर्व शाळा बंद राहतील असे जाहीर केले आहे.

पाताळगंगा नदीची इशारा पातळी २०.५० मीटर तर धोका पातळी २१.५२ मीटर आहे. बुधवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत या नदी पात्राने इशारा पातळी ओलांडली होती. त्यामुळे नदीकाठच्या सहा गावांना सतर्कतेचा इशारा तहसीलदार विजय तळेकर यांनी दिला आहे. लोणावळा, खोपोली व खालापूर या क्षेत्रांतील पाणी पाताळगंगा नदीला येऊन मिळते. त्यामुळे गुळसुंदे, आपटा, लाडीवली, कालिवली, सवणे व कराडे खुर्द या सहा गावांमध्ये दवंडी देण्यात आले आहे. बुधवारी खारपाडा रस्ता पाण्याखाली गेला होता. या रस्त्यावर पाणी असल्याने नागरिकांच्या सुरक्षेसाठी रस्त्याच्या एका बाजूला पनवेल शहर पोलीस तर दुसऱ्या बाजूला रसायनी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.  गाढी नदीची पनवलमधील इशारा पातळी ६ मीटर आहे तर धोका पातळी ६.५५ मीटर आहे. बुधवारी सायंकाळी सहा वाजता या नदीपात्राने ४.१० मीटर पर्यंत पातळी गाठली होती. हवामान विभागाचा अंदाज अचूक ठरल्यास माथेरान डोंगररांगांत मुसळधार पाऊस झाल्यास गाढी नदी धोका पातळी ओलांडू शकते. त्यामुळे पनवेल शहरातील पटेलमोहल्ला, कच्छी मोहल्ला, कोळीवाडा, बाराबंगला तसेच ग्रामीणमध्ये पारगाव डुंगी, ओवळा, नांदगाव, बंबाईकोळीवाडा या परिसरात पाणी शिरण्याची शक्यता आहे. पनवेल पालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांनी नदीकाठच्या लोकवस्तीला सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे आदेश दिले आहेत.  पटेल व कच्छी मोहल्ला येथील नागरिकांची तातडीची बैठकही घेण्यात आली. या बैठकीत माजी नगरसेवक मुकीद काजी, पालिकेचे उपायुक्त विठ्ठल डाके, अग्निशमन दलाचे अधिकारी अनिल जाधव, कार्यकारी अभियंता सुनील कटेकर उपस्थित होते. येथील नागरिकांना नजीकच्या शाळेत स्थलांतरित करण्याचे या बैठकीत ठरले.  बुधवारची रात्र पालिका व महसूल विभागासाठी महत्त्वाची असल्याने दोन्ही प्रशासनांकडून समन्वयाने काम सुरू होते.

मोरा मुंबई जलसेवाही खंडित

धोक्याचा इशारा देणारा तीन नंबरचा लाल बावटा हवामान विभागाने लावल्याने उरणच्या मोरा ते मुंबईच्या भाऊच्या धक्क्याच्या दरम्यानची जलवाहतूक सेवा सुरक्षेच्या कारणास्तव बंद ठेवण्यात आली असल्याची माहिती मोरा बंदर विभागाने दिली आहे. उरणमधील मोरा बंदर ते मुंबईतील भाऊचा धक्का दरम्यानची जलसेवा ही पावसाळय़ातही सुरू असते, मात्र  अनिमित असते.  मंगळवारपासून धोक्याचा इशारा देणारा बावटा लावण्यात आल्याने ही जलसेवा बंद करण्यात आली आहे. वातावरणातील बदलानंतर ही सेवा पूर्ववत होईल, अशी माहिती मोरा बंदर अधिकारी प्रकाश कांदळकर यांनी दिली.