पनवेल :कळंबोली सर्कल येथील मुंब्रा पनवेल महामार्गावर बांधलेला उड्डाणपुल हा सध्या अवजड वाहनांसाठी प्रतीक्षापूल बनला आहे. कळंबोली सर्कलवरील वाहतूक कोंडीचा प्रश्न वाहतूक पोलीस सोडवू न शकत असल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे. या सर्कलवर वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी सात ते आठ पोलीस कर्मचारी आणि वाहतूक वार्डन पोलीसांच्या मदतीला असतानाही वाहनचालकांना कळंबोली सर्कलवर मोठ्या प्रमाणात कोंडीचा सामना करावा लागत आहे. एकाच सर्कलवर १६ विविध रस्ते आपसात जोडले गेल्याने ही कोंडी होत असली तरी वाहतूक पोलीसांनी रस्त्यावर दंडात्मक कारवाई करण्यासोबत वाहतूक नियमन करण्याची मागणी वाहनचालकांकडून जोर धरत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कळंबोली सर्कलचा विस्तार पुढील काही वर्षांत होईल. यासाठी सरकार पाचशे कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम खर्च करणार आहे. अडीच ते तीन वर्षे या कामासाठी लागणार असले तरी कळंबोली सर्कलवर सध्या मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीमुळे मुंब्रा बाजूकडून जेएनपीटी बंदर, मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग आणि मुंबई गोवा या महामार्गाकडे जाणाऱ्या वाहनांना कळंबोली गावासमोर बांधलेल्या उड्डाणपुलावर अनेक मिनिटांची प्रतीक्षा करावी लागत आहे. कळंबोली सर्कलप्रमाणे रोडपाली सिग्नल आणि नावडे गावासमोरील उड्डाणपुलाखाली वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होते. दोन दिवसांपूर्वी ही कोंडी फोडण्यासाठी वाहतूक पोलीसांनी रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. मात्र यापूर्वीही अनेक चर्चा आणि प्रस्ताव पोलिसांकडून देऊनही वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटलेला नाही.

हेही वाचा…प्रवासी नसलेल्या बस थांब्यासाठी वळसा, एनएमएमटीच्या नाहक मार्गबदलाने वेळेचा अपव्यय

कामोठे येथील पथकर नाका (टोलनाका) खारघर येथे स्थलांतरित केल्यास नवी मुंबई आणि मुंबईच्या दिशेने पुण्याकडे जाण्यासाठी कामोठे टोलनाका चुकविणाऱ्या अवजड वाहनांना थेट कळंबोली येथून द्रुतगती महामार्गावर जावे लागेल त्यामुळे रोडपाली सिग्नलवरील ताण कमी होईल असा जुनाच प्रस्ताव पुन्हा वाहतूक पोलिसांनी रस्ते विकास महामंडळासमोर मांडला. मात्र टोलनाका स्थलांतर करणे म्हणजे पुन्हा सरकारमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी आणण्याचा नवा पेच या प्रस्तावासमोर उभा राहिला आहे. मुंब्रा पनवेल महामार्गावर नावडे गाव ते रोडपाली सिग्नल आणि रोडपाली सिग्नल ते कळंबोली सर्कल या मार्गिकेवर १२ फुटी रस्त्याचे रुंदीकरण तातडीने करणे गरजेचे आहे. त्यावर सुद्धा या बैठकीत चर्चा झाली. वरिष्ठांकडे प्रस्ताव पाठवितो त्या प्रस्तावाला मंजूरी मिळाल्यानंतर निविदा आणि त्यानंतर प्रत्यक्ष काम या सर्व प्रक्रियेत हा रुंदीकरणाचा प्रस्ताव अडकण्याची चिन्हे आहेत. रोडपाली सिग्नल येथील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी नावडे गावासमोरील उड्डाणपुल थेट खिडुकपाडा गावाच्या पुढेपर्यंत वाढविल्यास मोठी समस्या सुटेल असेही वाहतूक पोलीसांनी सूचविले मात्र यावर पुन्हा प्रस्ताव पाठविला आहे त्यास मंजूरी मिळाली नसल्याचे रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. सरकार कळंबोली सर्कलच्या सर्व रस्त्याची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी ५०० कोटी रुपये खर्च करुन नवीन पुलाचे जाळे उभारत आहे.

हेही वाचा…करंजातून निर्यात होणाऱ्या शेवंड आणि खेकड्यांची दरवाढ, शेवंड २ हजार तर खेकडा २ हजार ६०० रुपये किलो

नावडे येथील खराब सेवा रस्ता सुधारण्याची सूचना दिली आहे. एमआयडीसीतून येणाऱ्या वाहनांमुळे क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक या मार्गाने होते. रोडपाली सिग्नल येथे दोन पाळ्यांमध्ये वाहतूक कर्मचारी नेमले आहेत. शुक्रवारी सायंकाळपासून वाहने जास्त प्रमाणात असतात. सोमवारी तोच प्रवासी वर्ग परत येतो त्याचाही ताण असतो. शुक्रवारी आणि शनिवारी जेएनपीटी बंदरात मोठ्या बोटीमधून येणाऱ्या कंटेनर वाहतुकीचा ताण या सर्कलवर असतो. अवजड वाहने लोखंड बाजात तिसऱ्या रांगेत बेकायदा उभी केली जातात त्यावर सातत्याने फौजदारी गुन्हे दाखल करण्याची सूचना दिली आहे. तिरुपती काकडे, उपायुक्त, वाहतूक पोलीस विभाग

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Flyover constructed on mumbra panvel highway at kalamboli circle become waiting bridge for heavy vehicles sud 02