लोकसत्ता प्रतिनिधी

नवी मुंबई : शीव पनवेल महामार्गावरील कळंबोली सर्कलवर दररोज होणारी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी कळंबोली सर्कलचा विस्तार करण्याची घोषणा दोन वर्षांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पनवेल येथे केली होती. यासाठी भाजपचे आ. प्रशांत ठाकूर यांनी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला होता. आता दोन वर्षांनंतर या सर्कलच्या विस्तारीकरणासाठी ७७० कोटी ४९ लाख रुपयांच्या रस्ते, पूल बांधणी प्रकल्पाला केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग विभागाकडून मंजुरी मिळाली आहे. याबाबतची माहिती भाजपने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

कळंबोली सर्कलवरुन दररोज १ लाख ८५ हजार वाहनांची ये-जा होत असल्याने या जंक्शनचा विस्तार एकावर एक अशा बहुमजली तीन उड्डाणपुल आणि रस्त्याचे विस्तारीकरण या परिसरात करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सिडको मंडळ आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या अधिका-यांनी संयुक्तपणे आंतरराष्ट्रीय दर्जाचा रस्ते डिझाईन कंपनीला सल्लागार म्हणून नेमण्याची सूचना केली होती. पनवेल येथे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या महामार्ग लोकार्पण सोहळ्यासाठी दोन वर्षांपूर्वी एप्रिल २०२२ मध्ये केंद्रीयमंत्री नितिन गडकरी पनवेल येथे आले होते. यासाठी त्यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बहुमजली उड्डाणपूल आणि रस्त्यांचा विस्तारासाठी १२०० कोटी रुपये खर्च करावा लागणार असल्याचे सांगितले होते. परंतु केंद्रीय विभागाच्या विविध परवानग्या, रस्ते व पुलाचे आराखडा बनविण्याचे काम आणि त्या कामाच्या मंजूरीसाठी तब्बल दोन वर्षांपेक्षा अधिकचा काळ लागला.

आणखी वाचा-सिडकोची घरे नवी मुंबईबाहेरच, रेल्वे स्थानकाजवळील घरांचे स्वप्न अधुरे

भाजपचे पनवेलचे आ. प्रशांत ठाकूर आणि उरणचे अपक्ष आ. महेश बालदी यांनीसुद्धा वेळोवेळी केंद्र सरकारकडे या रस्ता विस्तारीकरणासाठी पाठपुरावा केल्याने या परवानगीचे श्रेय या दोन्ही आमदारांनी घेण्याचा प्रयत्न केला आहे. नुकतेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या विस्तारीकरणाच्या कामासाठी ७७०.४९ कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता दिली. यामध्ये १५.५३ किलोमीटरचा एक महत्वपूर्ण पायाभूत प्रकल्प उभारला जाणार आहे. यामुळे सर्कलवरील वाहतूक कोंडी फुटेल.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून मार्च महिन्यात मालवाहू विमाने उड्डाण घेणार असल्याने पनवेलच्या वाहतूकीवर अधिक ताण येणार आहे. त्यामुळे केंद्रीयमंत्री गडकरी यांनी कळंबोली सर्कलच्या कामाला मंजुरी दिली आहे.

आणखी वाचा-स्थानिकांना काम द्या या मागणीसाठी उरणच्या खाजगी बंदरातील कोळसा वाहतूक बंद; स्थानिक लॉरी मालक संघटनेचे आंदोलन सुरू

जेएनपीए, सिडको आणि राष्ट्रीय रस्ते विकास प्राधिकरणाने एकत्र येऊन प्रस्तावित नवी मुंबई विमानतळाच्या सीमाभागातील रस्ते विकसित करण्याची प्रक्रिया सुरू केली असून पॅकेज चारपर्यंतची कामे पूर्ण झाली असून पॅकेज पाचमध्ये कळंबोली सर्कल आणि विमानतळाच्या बाजूकडील बाहेर पडणा-या मार्गावर दळणवळणाचे चक्राकार बेट तयार करण्याचे प्रस्तावित होते. या कामासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचा सल्लागार नियुक्त करण्यात आला आहे.

निविदा प्रक्रिया लवकरच

सध्या कळंबोली सर्कलवर नाशिक, ठाणे, कल्याण -डोंबिवलीवरुन पनवेल- उरण येथील जवाहलाल नेहरू बंदराकडे जाणाऱ्या महामार्गावर अवजड वाहनांच्या रांगा लागल्या असतात. या महामार्गावरून सर्वाधिक वाहतूक ट्रक व ट्रेलरवरील कंटेनरची असते. वाहतूक कोंडीमुंळे इंधन वाया जाऊन वेळेचाही अपव्यय होतो. त्यामुळे सरकार या सर्कलचा विस्तार करीत आहे. सध्या कामाचा आराखडा तयार झाला असून निविदा प्रक्रिया लवकरच सुरु होणार आहे.