नवी मुंबई : नवी मुंबई परिसरामध्ये ज्यांचे स्वमालकीचे घर आहे, अशा व्यक्तींना आतापर्यंत सिडको महामंडळाच्या घर सोडतीमध्ये सहभाग घेता येत नव्हता, मात्र सिडको मंडळामध्ये काही उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या सूचनांनंतर ही अट शिथिल करण्यासाठी नवा प्रस्ताव बनविण्याचे काम सिडको मंडळाच्या पणन विभागात सुरू आहे. हा प्रस्ताव अद्याप प्राथमिक स्तरावर आहे. सिडकोच्या सोडतीमधील विक्रीविना शिल्लक घरांच्या विक्रीसाठी यामधून मोठा ग्राहक वर्ग मिळविण्यासाठी हा प्रस्ताव बनविण्याचे काम अंतिम टप्यात असल्याची माहिती सिडकोच्या विश्वसनीय सूत्रांनी दिली. सिडकोने अनेक सोडतींमध्ये यापूर्वीच घरे विक्रीसाठी उपलब्ध केली आहेत, ती या योजनेतून खरेदी करण्याची संधी नवी मुंबई क्षेत्रात स्वताचे घर असणाऱ्या व्यक्तींना मिळणार आहे.

सिडको महामंडळाने नवी मुंबईत ६७ हजार घरांचे बांधकाम पाच वर्षांपूर्वी हाती घेतले. मात्र ही ६७ हजार घरे बांधण्यापूर्वीच सिडकोच्या दफ्तरी सिडकोने बांधलेल्या विविध गृहप्रकल्पामधील हजारो घरे विक्रीविना शिल्लक आहेत. नुकत्याच काढलेल्या २६ हजार घरांच्या सोडतीला सिडकोच्या अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद मिळाला नसल्याने घरांमध्ये आणखी भर पडली आहे. केंद्र व राज्य सरकारची मर्जी राखण्यासाठी सिडको मंडळाला ६७ हजार घरांच्या बांधकामाचे उदिष्ट देण्यात आले. यासाठी सुमारे १५ हजार कोटी रुपये या गृह प्रकल्पाच्या बांधकामावर सिडको खर्च करत आहे. ही रक्कम सिडकोला कमी पडत असल्याने आतापर्यंत सिडकोने एसबीआय बँकेकडून ११२५ कोटी रुपये कर्ज घेतले आहे. त्याशिवाय नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ अधिसूचित प्रभाव क्षेत्र (नैना) प्रकल्प, खारघर तुर्भे लिंकरोड, मेट्रो मार्गिकेचे विस्तारित प्रकल्प, आंतरराष्ट्रीय विमानतळाला शहरांशी जोडणारे उलवा कोस्टल यांसारखी दळणवळणातील विविध रस्ते आणि उड्डाणपूल बांधण्याचे काम सिडको करीत आहे. याचसोबत जलवाहतुकीचे प्रकल्प, साडेबारा आणि साडेबावीस टक्के योजनेतील विकसित भूखंड वाटप यांसारख्या विविध प्रकल्पावर सिडकोत जोरदार काम सुरू आहे.

सिडको मंडळाकडे विक्रीविना घरे शिल्लक असल्याने या उपलब्ध घरांची वेळीच विक्री करुन तिजोरी भक्कम करणे हाच एकमेव पर्याय सिडकोला तारणार आहे. त्यामुळे आतापर्यंतच्या सिडकोने जाहीर केलेल्या विविध घरांच्या सोडतीमध्ये पाहिलेला प्रस्ताव पाहता जुन्या घरांना खरेदी करण्यासाठी नवा ग्राहक आणण्यासाठी सिडको मंडळाने स्वताची अट शिथिल कऱण्याचा पर्याय तपासण्याचे काम हाती घेतले आहे.

सध्या नवी मुंबईतील रेल्वेस्थानकलगत आणि महामार्ग, राष्ट्रीय व राज्य महामार्गांलगत तसेच शहरात मुख्य रस्ते वगळता इतर ठिकाणी घरांचे भाडे कमी मिळत आहे. वाशी, बेलापूर ही उपनगर वगळता खारघर, कळंबोली, रोडपाली, नावडे, तळोजा, कामोठे, नवीन पनवेल, करंजाडे या परिसरातील पाणी पुरवठा, सार्वजनिक बससेवा, प्रदूषण अशा समस्या भेडसावत असल्याने येथील मासिक भाड्यांचे दर कमी आहेत. त्यामुळे सिडको मंडळाने ही घरे विक्रीसाठी काढण्यापूर्वी महाराष्ट्र प्रदूषण मंडळ आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उच्चपदस्थांना बैठक घेऊन या परिसरात परिवहन, पाणी पुरवठा, प्रदूषणाचा मुद्दा निकाली काढल्यास घरे खरेदीदार वाढण्याची शक्यता आहे. याबाबत सिडको मंडळाच्या जनसंपर्क विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला मात्र संपर्क होऊ शकला नाही.

दर कमी राहिल्यास प्रतिसाद शक्य

नवी मुंबईत ज्यांच्या नावावर घर असेल अशा व्यक्तींना सिडकोची शिल्लक घरे खरेदी करण्याची संधी सिडको देणार आहे. सिडकोने ही अट शिथिल केल्यामुळे सर्वात मोठा खरेदीदार वर्ग ग्राहक रुपी सिडकोला मिळेल. मात्र सिडकोने पुढील सोडतीमधील घरांच्या किंमती कमी ठेवणे गरजेचे आहे.

सिडकोने मागील अनेक वर्षात काढलेल्या विविध सोडतीमध्ये लाभार्थ्यांनी त्यांची कागदपत्रे वेळीच सिडकोकडे पूर्तता न केल्याने तसेच काही वेळा नियमात बसत नसल्याने उमेदवार अपात्र ठरल्याने ही घरे शिल्लक राहिली आहेत.

ही घरे नव्याने विक्री करण्यापूर्वी या घरबांधणीचा काळ, त्यावर सिडकोने त्यावेळेस केलेला खर्च आणि सध्याचे संबंधित इमारतीच्या बांधकामाचे वय यानुसार संबंधित मालमत्तेचा घसारा रक्कम आणि बाजारमूल्याच्या २० टक्के कमी दराने घरे विक्रीसाठी उपलब्ध केल्यास नवी मुंबईत ज्या व्यक्तीचे घर आहे अशी मंडळी घर खरेदीत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करु शकतील.

Story img Loader