पालिकेची कारवाई रोखण्यासाठी अन्नपदार्थ विक्रेत्यांची शक्कल
एखाद्याच्या पोटाला घालून स्वत:चे पोट भरायचे तर रस्त्यावर यावे लागते; परंतु मागोमाग पालिका कारवाईचा बडगा उगारला जातोच, मग पदपथ वा रस्त्याकडेला थाटलेला ठेला वा दुकान तोडले जाते आणि विक्रेत्यांच्या पोटावर पाय येतो. बेकायदा व्यवसाय करायचा; मात्र कारवाई नको, हे उद्दिष्ट नवी मुंबईतील अन्नपदार्थ विक्रेत्यांनी ठेवून थेट चारचाकीवरच धंदा सुरू केला आहे. सध्या अशा विक्रेत्यांचे शहरात पेव फुटले आहे. तीन वा चारचाकी वाहनांचा यासाठी वापर केला जात आहे. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन चालकांना कोंडीचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे महानगरपालिकेच्या अतिक्रमणविरोधी विभागाने या प्रकाराकडे डोळेझाक केली आहे.
अशा विक्रेत्यांना राजकीय नेत्यांचा वरदहस्त आहे. त्यामुळे ते बिनधोक वाहने पार्क करून अन्नपदार्थ विक्री करीत आहेत.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात ठाणे-बेलापूर मार्गावर माहिती तंत्रज्ञान कंपन्यांची वाढ झपाटय़ाने झाली आहे. या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचीही संख्या अधिक आहे. त्यामुळे कामावर येताना वा जाताना ठेल्यावर काही चमचमीत खाण्याचा मोह आणि घरी जाईपर्यंत पोटाला आधार म्हणून अनेक कर्मचारी चारचाकींवरील खाद्यपदार्थाचा आस्वाद घेतात. पालिका प्रशासनाने रस्त्याकडेला बेकायदा व्यवसाय करणाऱ्या अन्नपदार्थ विक्रेत्यांवर कारवाईचा मोर्चा वळवला आहे. परंतु चाकांवरील अन्नपदार्थाची शहरांतील रेलेचेल नागरिकांच्या जिवावर बेतण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या वाहनांमध्ये सिलिंडर, तसेच केरोसीन शेगडय़ांसाठी वापरले जातात. अशा स्फोटक पदार्थाची कोणतीही सुरक्षा तपासली जात नाही. भविष्यात एखादी दुर्दैवी घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण, असा सवाल येथील काही नागरिकांनी केला आहे. मध्यंतरी पालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने काही विक्रेत्यांवर कारवाई केली होती; परंतु विक्रेत्यांनी रस्त्याकडेला बस्तान मांडले. त्यानंतर पुन्हा कारवाई करण्यासाठी अतिक्रमण विभागाने पुढाकार घेतला नाही. ऐरोली, घणसोली, कोपरखरणे, जुईनगर, सीबीडी बेलापूर, औद्योगिक पट्टय़ात ‘मोबाइल केंटरिंग’ सुरू आहेत; परंतु वाहतुकीस अडथळा निर्माण होईल, अशा ठिकाणी वाहन पार्क करण्यात येत असल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
यासंदर्भात नागरिकांनी वारंवार तक्रार करूनही कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. एखादी दुर्घटना घडण्याआधीच अशा बेकायदा खाद्यविक्रेत्यांवर कारवाई करणे गरजेचे असल्याचे मत येथील सुजाण नागरिकांनी व्यक्त केले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा