यशवंतराव चव्हाण क्रीडांगण सर्वसामान्यांसाठी खुले करण्याचा पालिकेचा निर्णय

‘फिफा’च्या १७ वर्षांखालील विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचे सराव सामने जिथे खेळवण्यात आले, त्या यशवंतराव चव्हाण क्रीडांगणाचे नवी मुंबईकरांसाठी स्वतंत्र फुटबॉल क्रीडांगण म्हणून जतन करण्यात येणार असल्याची माहिती पालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी ‘लोकसत्ता’ला दिली. स्पर्धेसाठी या मैदानात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचा लाभ नवी मुंबईतील फुटबॉलपटूंना होणार आहे.

‘फिफा’च्या स्पर्धेतील एकूण आठ सामने नवी मुंबईतील डॉ. डी. वाय. पाटील मैदानावर झाले. आपल्या देशाचा एकही सामना या मैदानावर खेळला गेला नसला, तरीही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद लाभला. बुधवारी झालेल्या अखेरच्या सामन्याला सुमारे ३९ हजार प्रेक्षक उपस्थित होते. शहरात तीन आठवडे फुटबॉलज्वर होता. याच स्पर्धेच्या सरावासाठी पालिकेने नेरुळ येथील यशवंतराव चव्हाण मैदान सज्ज केले होते. त्यासाठी कोटय़वधी रुपये खर्च करण्यात आले होते. ‘फिफा’च्या निकषांनुसार या मैदानाचा विकास करण्यात आला होता. मैदानासाठी अमेरिकेहून गवत आणि इटलीवरून विजेचे दिवे मागवण्यात आले होते. तांत्रिक बाबी तपासणाऱ्या ‘फिफा’च्या गटानेही या मैदानाचे तोंड भरून कौतुक केले.

न्यूझीलंड, माली, पॅराग्वे, तुर्की, घाना या ५ देशांनी या मैदानावर सराव केला. या मैदानावर एकूण ९ सराव सामने झाले. त्यामुळे येथील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधांवर शिक्कामोर्तब झाले आहे.

स्पर्धेसाठी नेरुळमधील युनिव्हर्सिटी मैदान, वाशीतील नवी मुंबई स्पोर्ट्स क्लबचे मैदान व नेरुळ येथील यशवंतराव चव्हाण क्रीडांगण या तीन मैदानांची निवड करण्यात आली होती. यापैकी नवी मुंबई स्पोर्ट्स क्लब मैदान हे क्लबने तयार केले, तर यशवंतराव चव्हाण मैदान पालिकेने तयार केले. दोन्ही क्रीडांगणे फुटबॉलसाठीच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे नवी मुंबईकरांना आंतरराष्ट्रीय दर्जाची मैदाने उपलब्ध होणार आहेत.

पालिकेने एवढे देखणे व आंतरराष्ट्रीय दर्जाचे फुटबॉल मैदान तयार केले आहे. त्याचा उपयोग शहरातील युवा खेळाडूंना होईल. शहरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अल्प दरात प्रशिक्षण देता येईल. या मैदानाचा वापर फक्त फुटबॉल मैदान म्हणूनच होणार आहे. त्यादृष्टीने या ठिकाणी सुरक्षारक्षकही ठेवण्यात आले आहेत.

–  डॉ. रामास्वामी एन., आयुक्त, नवी मुंबई महापालिका

वाशी येथे सुमारे ४ कोटी खर्च करून नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशनने आंतरराष्ट्रीय दर्जाचे फुटबॉल मैदान बनवले आहे. आमच्या मैदानासाठी मुंबई फुटबॉल सिटी क्लबशी करार करून शहरातील मुलांना फुटबॉल प्रशिक्षण दिले जाणार आहे.

डॉ. दिलीप राणे, उपाध्यक्ष, नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशन