यशवंतराव चव्हाण क्रीडांगणावर खेळण्यास पालिकेचा मज्जाव; स्थानिक आक्रमक

‘फिफा’ आयोजित १७ वर्षांखालील फुटबॉल विश्वचषक स्पर्धेसाठी सराव मैदान म्हणून तयार करण्यात आलेल्या यशवंतराव चव्हाण क्रीडांगणावरून ‘रण’ तापू लागले आहे. या मैदानाचा वापर केवळ फुटबॉलसाठी व्हावा यासाठी पालिका आग्रही आहे. अन्य कारणांसाठी वापर केल्यास गुन्हा दाखल करण्याचा इशाराही आयुक्त रामास्वामी एन. यांनी दिला आहे, तर दुसरीकडे आम्ही पूर्वीपासूनच इथे क्रिकेट खेळतो आणि यापुढेही खेळणार, असा निर्धार परिसरातील रहिवासी आणि दारावे ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. पालिकेने सध्या येथे अतिक्रमण विभागाचे दोन पोलीस सुरक्षेसाठी तैनात ठेवले आहेत.

नेरुळ सेक्टर १९ ए येथे यशवंतराव चव्हाण क्रीडांगण आहे. परंतु हा भूखंड उद्यनासाठी पालिकेकडे हस्तांतरित करण्यात आला होता. त्यानंतर विभागात आजूबाजूला अनेक उद्याने विकसित करण्यात आली. त्यामुळे वापरात बदल करून या ठिकाणी मैदान तयार करण्यात आले. या मैदानात स्थानिक मुले क्रिकेट खेळत. अनेकदा याच मैदानात लग्न समारंभ व सामाजिक कार्यक्रम होत. त्यासाठी हे मैदान भाडय़ाने दिले जात असे.

‘फिफा’ स्पर्धेसाठी कोटय़वधी रुपये खर्च करून या मैदानाला आंतरराष्ट्रीय क्रीडांगणाचे स्वरूप देण्यात आले. नवी मुंबई पालिकेचे फुटबॉल मैदान नसल्यामुळे पालिकेने हे मैदान यापुढे केवळ फुटबॉलसाठीच देण्याचा निर्णय घेतला, मात्र स्थानिकांनी त्याला विरोध केला आहे. आम्हाला खेळासाठी मैदान नाही, त्यामुळे क्रिकेट खेळण्यासाठी हे मैदान खुले ठेवावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

या ठिकाणी प्रशिक्षक नेमून मुलांना अल्प दरात फुटबॉल प्रशिक्षण देण्याची तयारी पालिकेने सुरू केली आहे, पण आम्ही रविवारपासून येथे क्रिकेट खेळायला सुरुवात करणार, अशी भूमिका स्थानिक मुलांनी घेतली आहे. याबाबत स्थानिक नगरसेवक सुनील पाटील यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

  • २६,१४६ – चौ.मी. यशवंतराव चव्हाण क्रीडांगणाच्या भूखंडाचे क्षेत्रफळ
  • ८९७० – चौ.मी. फुटबॉल मैदानाचे

क्षेत्रफळ

पालिकेने चांगले फुटबॉल मैदान तयार केले आहे. तिथे अल्प दरात प्रशिक्षण देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. फुटबॉल मैदानावरच क्रिकेट खेळता येणार नाही. त्यासाठी बाजूला जागा आहे. तिथे क्रिकेट खेळण्यास परवानगी देण्यात येईल. परंतु गैरवापर करण्याचा प्रयत्न केल्यास गुन्हे दाखल करण्यात येतील. या ठिकाणी सुरक्षाव्यवस्थाही करण्यात आली आहे.

डॉ. रामास्वामी एन. आयुक्त, नवी मुंबई महानगरपालिका

पालिकेने येथे फुटबॉलसाठी देखणे मैदान तयार केले आहे. त्याचा योग्य वापर व्हावा, नवी मुंबईतील खेळाडूंना फुटबॉल प्रशिक्षण मिळावे, यासाठी पालिकेने व्यवस्था करावी. फुटबॉलव्यतिरिक्त अन्य खेळ खेळण्यासाठीही येथे जागा ठेवण्यात आली आहे. ती क्रिकेटसाठी द्यावी.

संदीप सुतार, माजी नगरसेवक

आम्ही सुरुवातीपासूनच या ठिकाणी क्रिकेट खेळतो. पालिकेने येथे फुटबॉल मैदान तयार केले आहे; परंतु आम्हाला क्रिकेट खेळण्यास मनाई करू नये. आम्हालाही खेळण्यासाठी जागा ठेवावी.

प्रल्हाद म्हात्रे, दारावे गाव 

शहरात पालिकेचे एकही फुटबॉल मैदान नाही. आमच्या मुलांना प्रशिक्षणासाठी हजारो रुपये मोजावे लागतात. पालिकेने अल्प दरात प्रशिक्षण द्यावे, फुटबॉल अ‍ॅकॅडमी सुरू करावी. काही ठरावीक मुलेच येथे क्रिकेट खेळतात. या मैदानावरून सभागृहातही वादंग झाला होता. वाद पोलीस ठाण्यातही गेला होता. बाजूच्या जागेत क्रिकेट खेळण्यास परवानगी द्यावी.

आनंद पावले, नेरुळ सेक्टर २१