जमीन हस्तांतरित करण्याची वन विभागाची मागणी
उरण तालुक्यात वन विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या परिसरात २४० हेक्टर जमिनीवर कांदळवन असून महसूल विभागाच्या हद्दीतील १७०० हेक्टर जमिनीवर कांदळवनाची वाढ झाली असल्याने ही जमीन वन कायद्यानुसार वन विभागाकडे हस्तांतरित करावी, अशी मागणी वन विभागाने महसूल विभागाकडे केली आहे.
कांदळवन हे समुद्राच्या महाकाय लाटांपासून मातीची होणारी धूप, पृथ्वीवरील जैवविविधता यांच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे कांदळवन संरक्षित करण्यात आले असून त्याची तोड करणे किंवा ती नष्ट करणे हा गुन्हा ठरविण्यात आलेला आहे. सध्या समुद्रात मोठय़ा प्रमाणात मातीचा भराव टाकून अतिक्रमण केले जात असल्याने समुद्राच्या पाण्याची पातळीही वाढू लागली आहे. याचा परिणाम होऊन भरतीचे पाणी सध्या लोकवस्ती, गावात आणि शेतीत शिरू लागले आहे. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी कांदळवनाचे संरक्षण आवश्यक असल्याने कांदळवनाच्या संरक्षण आणि देखभालीची जबाबदारी वन विभागाकडे देण्यात आलेली आहे. मात्र वनविभागाकडे मनुष्यबळाची कमतरता असल्याने कांदळवन नष्ट होण्याच्या प्रमाणात वाढ झालेली आहे. महसूल विभागाच्या करंजा ते भेंडखळ खाडीदरम्यान असलेल्या जमिनीवर कांदळवनाची वाढ झालेली आहे. कांदळवनाची वाढ ही येथे येणाऱ्या देशी-विदेशी पक्ष्यांसाठी महत्त्वाची असल्याचे पक्षीप्रेमींनी म्हटले आहे. कांदळवन हे कायद्यानुसार वन विभागाकडे येत असल्याने कांदळवनाचे वाढीव क्षेत्र वन विभागाकडे हस्तांतरित करावे, अशी मागणी महसूल विभागाकडे केली असल्याचे वन विभागाचे वनपाल चंद्रकांत मराडे यांनी सांगितले.

Story img Loader