नवी मुंबई शहरातील कांदळवनावर राडारोडयाचा भराव टाकून तसेच अतिक्रमण करण्यात आलेले आहे. त्यामुळे याला आळा घालण्यासाठी वनविभागाने आता कंदवळण क्षेत्रात सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्यात येणार असून अधिकाऱ्यांनी जागांचे सर्वेक्षण केले आहे. त्यानुसार आधीचे ५१ आणि आता ४६ असे एकूण १११ ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. याबाबत लवकरच निविदा प्रक्रिया राबवून सीसीटीव्ही यंत्रणा कार्यवनीत करण्यात येईल अशी माहिती वनविभागाने दिली आहे.
हेही वाचा >>> नवी मुंबई: दूध आणायला गेलेल्या विवाहितेची खाडीत उडी मारुन आत्महत्या
दिवसेंदिवस जमिनीचे भाव वधारत आहेत. त्यामुळे काही असामाजिक घटकांकडून खाडीतील कांदळणवनावर अतिक्रम करून त्याचा अयोग्य वापर करण्याचे सत्र सुरू असून जैवविविधता नष्ट करण्यात येत आहे. त्यामुळे हे अतिक्रमण टाळण्यासाठी , अतिक्रमणाला आळा घालण्यासाठी शासनाने कांदळवन क्षेत्रात सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य शासनाने मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील कांदळवनावर नजर ठेवण्यासाठी सीसीटीव्ही बसवण्याचा निंर्णय तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मागील वर्षी घेण्यात आला होता. मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रात १०६ संवेदनशील ठिकाणी एकूण २७९ सीसीटीव्ही कॅमेरे लावले जातील. यासाठीची ३५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा प्रकल्प तीन टप्प्यात राबविण्याचे निश्चित करण्यात आले असून पहिल्या टप्प्यात भिवंडी, दुसऱ्या टप्प्यात पश्चिम व मध्य मुंबई व तिसऱ्या टप्प्यात नवी मुंबई व ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्याचा समावेश आहे. त्यासाठी वन विभागाकडून कॅमेरे बसवण्याबाबत जागांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे . या सर्वेक्षणात १११ ठिकाणी निश्चित करण्यात आली असून लवकरच निविदा प्रक्रिया राबवून या ठिकाणी कॅमेरे बसवण्यात येतील अशी माहिती वन परिक्षेत्र अधिकारी कांदळवन संधारण नवी मुंबई सुधीर मांजरे यांनी दिली. त्यामुळे आता नवी मुंबईतील कांदळवन पाणथळ जागा सीसीटीव्हीच्या कक्षेत येणार आहेत.
वाशी खाडीत पर्यावरणात्मक दृष्टया १ कोटी २६ लाखांचे नुकसान
वाशी खाडीत राखीव कांदळवनात तसेच सिडकोच्या जागेत राडारोड्याचा भराव टाकून तेथील कांदळवन नष्ट करून मोठ्या प्रमाणात अनधिकृत झोपड्या बांधून भाडे आकारणी करण्यात येत होती. एकुण ३.८८ हेकटर क्षेत्रावर अंदाजे १७, २४२ कांदळवन वृक्षांची कत्तल करून पर्यावरणात्मक दृष्टया १ कोटी २६ लाखांचे प्रति वर्ष नुकसान केलेले आहे. वन विभाग, सिडको आणि महापालिका यांनी संयुक्तपणे ३५४ झोपड्यांवर कारवाई केली आहे.यात १०३ झोपड्या अधीसूचित कांदळवनात होत्या त्यावर वन विभागाने स्वतंत्र कारवाई करुन १० जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. सलग चार दिवस सातत्याने ही कारवाई करून येथील झोपड्या जमीनदोस्त करून येथील नाल्यांचे प्रवाह पूर्ववत करण्याचा प्रयत्न केला आहे.