नवी मुंबई : पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून अल्प उत्पन्न गटातील रहिवाशांना परवडणारी घरे मिळावीत यासाठी सुरू करण्यात आलेल्या योजनेतील घरांचे दर ७५ लाखांच्या घरात कसे असू शकतात, असा थेट सवाल राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी उपस्थित केला आहे. वाशीत ट्रक टर्मिनलच्या जागेवर उभ्या करण्यात आलेल्या या घरांचे दर प्रति चौरस फुटाला २५ हजारांपर्यंत जात आहेत. वाशीसारख्या शहरात सिडकोच्या जुन्या इमारतींमधील बऱ्याच घरांच्या किमती याहून कमी आहेत. मग सिडकोने गरीब, गरजूंसाठी उभारलेली ही घरे स्वस्त आणि परवडणारी कशी, असा सवाल नाईक यांनी उपस्थित केला आहे.
नवी मुंबई, पनवेल, उरण यांच्यासह एकत्रितपणे ओळखल्या जाणाऱ्या महामुंबईच्या प्रगतीचा वेध घेऊन भविष्यातील प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी ‘लोकसत्ता’ने आयोजित केलेल्या ‘ॲडव्हाण्टेज महामुंबई’ या परिषदेत नाईक यांनी यासंबंधीचे भाष्य केले. यानंतर ‘लोकसत्ता’सोबत बोलताना नाईक यांनी या मुद्द्याचे विश्लेषण करताना ही योजना गरिबांसाठी कशी, असा थेट सवाल केला. पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून परवडणारी घरे सर्वसामान्यांना मिळावीत हा मूळ उद्देश आहे. ही घरे वाशी आणि नवी मुंबईतील मोक्याच्या ठिकाणी उभारण्याची प्रक्रियाच मुळात धक्कादायक होती. सिडकोने आंतरराष्ट्रीय विमानतळालगत ‘नैना’ (नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट नोटिफाईड एरिया)सारखी नगरनियोजनाची परियोजना आखली आहे. असे असताना याच परिसरात परवडणाऱ्या घरांची उभारणी का केली गेली नाही, असा थेट सवाल नाईक यांनी उपस्थित केला.
वाशीत ट्रक टर्मिनलसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी ही घरे उभारण्यात आली. हा संपूर्ण परिसर मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत येणाऱ्या कृषी मालाच्या बाजारपेठांचा आहे. या ठिकाणी दररोज देशभरातून हजारोंच्या संख्येने लहान-मोठी वाहने येत असतात. ट्रक टर्मिनलची ही जागा यासाठी महत्त्वाची आहे. वाशीत स्वस्त आणि किफायतशीर घरे सर्वसामान्यांना मिळावीत यासाठी ही घरे उभारत आहोत असे चित्र सिडकोने उभे केले. प्रत्यक्षात येथे उभारलेली घरे स्वस्त आणि किफायतशीर आहेत का, असा सवाल नाईक यांनी उपस्थित केला.
सिडकोचा आणि सामान्यांचा संबंध उरला आहे का?
वाशी आणि परिसरात सध्या मोठ्या प्रमाणावर पुनर्विकासाचे प्रकल्प सुरू आहेत. या प्रकल्पांमधील नव्या घरांच्या किमती कोटींच्या घरात असल्या तरी चौरस फुटाचा भाव ३० ते ३२ हजारांच्या घरात आहे. सिडकोने वाशी येथे पंतप्रधान आवास योजनेची जी घरे उभारली तेथील घरांचे दर ७५ लाखांपर्यंत आहेत. हा दर प्रति चौरस फुटाला २५ हजारांच्या घरात जातो. प्रति चौरस फूट २५ हजार रुपयांनी विकले जाणारे घर सर्वसामान्यांना कसे परवडेल, असा थेट सवाल गणेश नाईक यांनी उपस्थित केला. घरांचे दर ठरविणाऱ्या अधिकाऱ्यांचे डोके तरी ठिकाणावर आहे का, अशी टीका करताना हा विषय आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत नेणार आहोत, असेही ते म्हणाले. ज्या नागरिकांनी ही घरे विकत घेण्याचा प्रयत्न केला आहे त्यांच्या इरादापत्रात कमी आकाराची घरे मिळाल्याच्या तक्रारी आहेत. हा एकंदर कारभार पाहता सिडको आणि सर्वसामान्यांचा काही संबंध तरी उरला आहे का, असा थेट सवाल नाईक यांनी उपस्थित केला.