नवी मुंबई : नवी मुंबईत ३० एकरच्या डीपीएस फ्लेमिंगो तलावात भरतीचे येणारे पाणी अडवल्यामुळे पाण्यावर शेवाळ साचले असून पाण्याला दुर्गंधी येत आहे. त्यामुळे या तलावात अद्याप फ्लेमिंगोंचे आगमन झाले नाही. भरतीचे पाणी तलावात येऊन पुन्हा ते ओहोटीच्यावेळी समुद्रात जायला हवे परंतु हे पाणी अडवले आहे. हे पाणी सिडकोनेच अडवले असून ते तात्काळ खुले करुन देण्याचे निर्देश वनमंत्री नाईक यांनी ऐरोली,बेलापूर खाडीमार्गे पाहणी दरम्यान दिले आहेत.
वन सचिव वेणुगोपाल रेड्डी यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीने यापूर्वी डीपीएस सरोवराचे संरक्षण राखीव म्हणून शिफारस करण्याचा निर्णय घेतला आहे. सिडकोलाही आर्द्रभूमीच्या आत आणि बाहेर अखंडित पाण्याचा प्रवाह सुनिश्चित करण्यास सांगितले आहे. परंतु हजारो फ्लेमिंगोंना आकर्षित करणारा तलाव शेवाळ आणि चिखलाने भरला आहे. सिडकोनेच पाण्याचा प्रवाह काही महिन्यांपासून बंद केला आहे, अशी तक्रार नॅटकनेक्ट फाऊंडेशनने मुख्यमंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली होती. त्यावर कार्यवाहीचे आदेश दिले आहेत. तर दुसरीकडे नाईक यांनीही नुकतीच खाडी किनारा पाहणी दरम्यान सिडकोवर संताप व्यक्त केला.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील विमानाला पक्ष्यांचा धोका टाळण्यासाठी डीपीएस तलाव आणि एनआरआय, टीएस चाणक्य आणि पाणजे पाणथळ यांसारखी स्थलांतरित पक्ष्यांची ठिकाणे जतन करणे आवश्यक आहे परंतू जाणीवूर्वक पाण्याचा प्रवाह रोखण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप वारंवार पर्यावरणप्रेमी यांनी केला आहे. यावर्षीच्या सुरू असलेल्या फ्लेमिंगोच्या आगमनाच्या हंगामात डीपीएस तलावाकडे फ्लेमिंगो फिरकलेच नाहीत. एकीकडे टीएस चाणक्य तलावात फ्लेमिंगोंचा वावर सुरू असताना डीपीएस तलावात फ्लेमिंगो नाहीत याबाबतही वारंवार पर्यावरणप्रेमींनी संताप व्यक्त करत मानवी साखळी आंदोलन केले आहे.
मागील वर्षी ह्याच डीपीएस तलाव वाचवण्यासाठी पर्यावरणवाद्यांनी आंदोलन केले होते. त्यानंतर गणेश नाईकांच्या आक्रमक भूमिकेनंतर भरतीचे पाणी तलावात येण्याचा मार्ग मोकळा केला होता.परंतु आता खाडीतून आलेले पाणी परत खाडीत जाण्यासाठीचा मार्ग माती व मलबा टाकून बंद करण्यात आला आहे. – बी. एन. कुमार ,संस्थापक नॅटकनेक्ट