नवी मुंबई : नवी मुंबईतील माजी नगरसेवक भरत जाधव यांनी युवक शहर प्रमुख दत्ता घंगाळे आणि त्यांचे मित्र नरेंद्र जुराने यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार जुराने यांच्या सीवूडस् येथील कार्यालयात घडला. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून या प्रकरणी एनआरआय पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
हेही वाचा – प्रियसीचा खून करणाऱ्या प्रियकराच्या मृतदेहावर महिन्याभरानंतर हत्येचा गुन्हा दाखल
यातील फिर्यादी भाजप माजी युवक अध्यक्ष दत्ता घंगाळे, भाजप माजी सचिव नरेंद्र जुराने आणि भाजपचे माजी नगरसेवक भरत जाधव हे सर्व एकमेकांचे परिचित असून सीवूडस् भागात राहतात. काल भरत जाधव हे जुराने यांच्या कार्यालयात आले आणि काही आर्थिक व्यवहारावरून जाधव यांचे जुराने यांच्या सोबत वाद झाले. त्यातून जुराने आणि दत्ता घंगाळे यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली. माझ्यात आणि जुराने यांच्यातील व्यवहारात दत्ता घंगाळे याने पडण्याची गरज नाही, असेही जाधव यांनी बोलल्याचे दिसून येत आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या प्रकरणी दत्ता घंगाळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून एनआरआय पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा नोंद केला आहे.